भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ९६ धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात केली. रहाणे, विहारी आणि पंत ठराविक फरकाने बाद झाल्यावर रविंद्र जाडेजा मैदानावर आला. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपली कमाल दाखवणारा जाडेजा फलंदाजीत काय करतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. जोश हेजलवूडने ऋषभ पंतला माघारी धाडल्यानंतर जाडेजाला पहिला चेंडू टाकला. चेंडू ऑफ साईडने थोडासा उसळी घेत निघून गेला, पण त्यानंतर जाडेजा आणि हेडलवूड यांच्यात नजरानजर झाल्याचं दिसलं. आधी हेजलवूडने जाडेजाकडे खून्नसने पाहिलं. जाडेजानेही त्याला तसंच उत्तर दिलं. काही क्षणांनंतर दोघेही एकमेकांकडे बघून हसूही लागले.
View this post on Instagram
त्याआधी, दिवसाच्या सुरूवातीला अजिंक्य रहाणे १ चौकार आणि १ षटकार खेळून २२ धावांत माघारी परतला. पाठोपाठ हनुमा विहारीदेखील बाद झाला. हेजलवूडने अप्रतिम थ्रो करत त्याला धावचीत केलं. पंतने पुजाराला चांगली साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारीदेखील केली. पण मोक्याच्या क्षणी पंत स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला. त्याने ४ चौकारांसह ३६ धावा केल्या.
तत्पूर्वी दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा शुबमन गिलसोबत सलामीला मैदानावर आला. या दोघांनी ७० धावांची दमदार भागीदारी केली. रोहितने ७७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत २६ धावा केल्या. शुबमन गिलने डाव पुढे नेत आपलं पहिलं कसोटी अर्धशतक झळकावलं, पण त्यानंतर लगेचच तोही झेलबाद झाला. १०१ चेंडूत ८ चौकारांसह त्याने ५० धावा केल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 9:20 am