भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात जामनगर विरुद्ध अमरेली या टी-२० सामन्यात विक्रमी कामगिरी केली आहे. जामनगर संघाकडून खेळताना जडेजाने एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. अवघ्या ६९ चेंडूंमध्ये त्याने १५४ धावांची दमदार केळी केली. या खेळीच्या माध्यमातून त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी केलेली त्याची निवड योग्य असल्याचेच दाखवून दिले आहे असे म्हणता येईल.

जडेजाच्या कामगिरीच्या जोरावर जामनगर संघाने २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या मोबदल्यात २३९ धावांचा डोंगर उभारला. समान्याच्या पंधराव्या षटकामध्ये जडेजाने सहा षटकार मारले. त्याने एकूण १० षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १५४ धावांची खेळी केली. १५४ पैकी १२० धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अमरेलीच्या संघाला केवळ ११८ धावांपर्यंत मजल मारता आली आणि जामनगर संघाने १२१ धावांनी विजय मिळवला. जामनगरच्या संघातील महेंद्र जेठवाने गोलंदाजी करताना चार ओव्हरमध्ये सहा धावा देऊन तीन विकेट्स मिळवल्या. जडेजाच्या दमदार कामगिरीमुळे मोठा विजय मिळवता आल्याने जामनगरच्या खात्यात ४ गुणांची भर पडली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर यंदाचे वर्ष जडेजासाठी म्हणावे तितके चांगले गेले नाही. वर्षाच्या सुरवातीला कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत जडेजाने आयसीसीच्या गोलंदाजांच्या आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बरीच सुधारणा करुन अव्वल स्थानही पटकावले. मात्र, कामगिरीमध्ये सातत्य न राखता आल्याने कसोटीबरोबरच एकदिवसीय संघामधून त्याला वगळण्यात आले. जडेजा आणि आर. अश्विन हे दोघेही फिरकीपटू मागील अनेक दिवसांपासून एकही एकदवसीय तसेच कसोटी सामना खेळलेले नाहीत. जडेजाची दक्षिण आफ्रीका दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या जडेजाचा असाच फॉर्म कायम राहिल्यास दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होईल.