भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कब्जा करणारा जडेजा हा अनिल कुंबळेनंतरचा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. कुंबळेने १९९६मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील अग्रस्थान काबीज केले होते.
झिम्माब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पाच सामन्यांत पाच बळी घेणाऱ्या जडेजाने चार स्थानांनी आगेकूच करत वेस्ट इंडिजच्या सुनील नरिनसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर मोहोर उमटवली आहे. कुंबळेने नोव्हेंबर ते डिसेंबर १९९६मधील ११ सामन आपले अग्रस्थान टिकवले होते. त्याआधी कपिल देव (मार्च १९८९) आणि मणिंदर सिंग (डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९८८) यांनी अव्वल स्थानावर दावा केला होता.
दरम्यान, झिम्माब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय सांघिक क्रमवारीतील आपले अव्वल स्थान टिकवले आहे. फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या स्थानात घसरण होऊन ते अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या स्थानी स्थिरावले आहेत. सुरेश रैनाने एका स्थानाने सुधारणा करत १७वे तर शिखर धवनने १६ स्थानांनी आगेकूच करत २३वे स्थान मिळवले आहे.