सध्या भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूशी लढत आहे. अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी यासारख्या सर्व विकसीत देशांना या विषाणूचा फटका बसला आहे. भारतामध्येही महत्वाच्या शहरात करोना बाधित रुग्ण सापडत असून आतापर्यंत १०० पेक्षा जास्त भारतीयांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्याच्या खडतर काळात जगभरात महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखत २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. दरम्यान या काळात अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणारा स्टिव्ह स्मिथ आणि इश सोधी यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या. यावेळी स्मिथने भारतीय संघाचं आणि रविंद्र जाडेजाचं कौतुक केलं.

“रविंद्र जाडेजाला भारतामध्ये खेळणं अत्यंत कठीण आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करत असताना जाडेजाचा चेंडू कधी अनपेक्षित वळतो तर कधी वेगाने निघून जातो. गुड लेंथवर टप्पा ठेवत फलंदाजाला फसवणं त्याला जमतं. माझ्या मते हेच सातत्य कायम राखल्यामुळे त्याला खेळणं कठीण होऊन बसतं. लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्यांना गुगली चेंडू टाकता येणं हे महत्वाचं मानलं जातं. मात्र जाडेजासारखे गोलंदाज जेव्हा आपल्या शैलीत फारसा बदल न करता चेंडूची गती कमी-जास्त करतात त्यावेळी त्यांना खेळणं कठीण असतं. फार कमी गोलंदाजांना असे चेंडू टाकायला जमतं, रविंद्र जाडेजा हा त्यांच्यापैकी एक आहे.” आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या स्मिथने जाडेजाचं कौतुक केलं.

यावेळी स्टिव्ह स्मिथने भारतीय संघाचंही कौतुक केलं. “ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणून आम्ही नेहमी अ‍ॅशेल मालिका आमच्यासाठी किती मोठी आहे हे बोलत असतो. पण सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ अव्वल आहे, आणि भारतात कसोटी क्रिकेट खेळणं किती अवघड आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतात कसोटी मालिका जिंकणं हे चित्र पहायला मला आवडेल.” तेराव्या हंगामासाठी लिलाव पार पाडल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने आपला कर्णधार अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे देत स्टिव्ह स्मिथने संघाचं नेतृत्व सोपवलं होतं.