संपूर्ण देश अजुनही करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करतो आहे. ४ महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाउनमध्ये काढल्यानंतर अर्थचक्राला गती देण्यासाठी सरकारने हळुहळु काही गोष्टींना परवानगी दिली आहे. अनलॉकमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली असली तरीही सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं असे नियम घालून देण्यात आले आहेत. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याच नियमाचा भंग केल्याप्रकरणी चर्चेत आला आहे.

सोमवारी रात्री ९ वाजल्याच्या दरम्यान रविंद्र जाडेजा आपली पत्नी रिवाबासोबत कारमधून घराबाहेर पडला होता. राजकोटमधील किसनपारा चौकात पोलिसांनी जाडेजाची गाडी अडवली. यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस हवालदार सोनल गोसाई यांनी जाडेजाला मास्क न घातल्यामुळे दंड आकारण्यात येईल असं सांगितलं. इथूनच दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाल्याचं कळतंय. गोसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाडेजाने कारमध्ये असताना मास्क घातलेला नव्हता. याच कारणासाठी जाडेजाला आपण थांबवल्याचंही गोसाई म्हणाल्या. तर जाडेजाने सोनल गोसाई आपल्याशी उद्धटपणे वागल्याची तक्रार केली आहे.

या घटनेनंतर आलेल्या ताणामुळे गोसाई यांना खासगी रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. याप्रकरणी राजकोटचे पोलिस उपायुक्त मनोहरसिंह जाडेजा यांनी, जाडेजा व गोसाई या दोघांचीही बाजू ऐकून घेतलेली आहे असं सांगितलं. “अद्याप या प्रकरणी दोघांनीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. परंतू आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जाडेजाने गाडीत असताना मास्क घातला होता. जाडेजाच्या पत्नीने मास्क घातला होता की नाही याचा तपास सुरु आहे.”