वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने २३ सदस्यीय संघाची घोषणा केली. यात काही नावांचा समावेश नाही आणि त्यातील एक नाव डॅनियल सॅम्सचे आहे. रिपोर्ट्सनुसार अलीकडेच भारतातून आपल्या देशात परतलेल्या या खेळाडूने काही काळ क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ब्रेक मागितला होता. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

आयपीएलमध्ये आरसीबीच्या टीममध्ये सामील झालेल्या सॅम्सने वैद्यकीय आणि वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेचादेखील तो भाग होता. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे सॅम्सने न खेळण्याचा निर्णय घेतला. सॅम्स हा असा ब्रेक घेणारा पहिला खेळाडू नाही. ग्लेन मॅक्सवेल, विल पुकोव्स्की आणि निक मॅडिनसन यांसारख्या खेळाडूंनी याआधी अशी विश्रांती घेतली आहे.

बर्‍याच वेळा खेळाडूंनी बायो बबलमध्ये थकवा जाणवत असल्याचे कारण सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघालाही आगामी काळात टी-२० विश्वचषक खेळावा लागणार आहे, त्यामुळे या ब्रेकचा फायदा सॅम्सला होऊ शकेल. वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात मार्नस लाबुशेनसारख्या खेळाडूंना जागा मिळाली नाही. संघात स्थान न मिळाल्याने लाबुशेनदेखील निराश झाला आहे.

आयपीएल २०२१मध्ये सामील झालेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू काल सोमवारी घरी पोहोचले आहे. मालदीवहून सिडनीला पोहोचल्यानंतर खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. करोनामुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. शिवाय, ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवर १५ दिवसाची बंदी घातल्याने बहुतेक परदेशी खेळाडू मालदीवमध्ये पोहोचले होते.