देवदत्त पडिक्कलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सूर गवसला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील त्याचं पहिलं शतक झळकावलं. या सामन्यात देवदत्त पडिक्कलनं ५२ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली. यात ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. यापूर्वीच्या दोन सामन्यात तो झटपट बाद झाला होता. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात १३ चेंडूत ११ धावा केल्या होत्या. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर शाहबाज नदीमनं झेल पकडून त्याला तंबूत पाठवलं होतं. कोलकाता विरुद्धच्या सामन्यातही २८ चेंडूत २५ धावा करू शकला. प्रसिध क्रिष्णाच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने त्याचा झेल घेतला आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

‘हे शतक माझ्यासाठी खास आहे. मी फक्त याची वाट पाहू शकत होतो. जेव्हा करोनाग्रस्त होतो. तेव्हा वाटलं होतं की, मी पहिला सामना खेळेन. मात्र तसं झालं नाही. संघाच्या विजयात योगदान देण्यास इच्छुक होतो. आज खेळपट्टी चांगली होती. चेंडू बॅटवर येत होता. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.’ असं देवदत्तने सामना संपल्यानंतर सांगितलं.

IPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आघाडीचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला करोनाची लागण झाल्याने चिंतेचं वातावरण पसरलं होतं. त्यानंतर करोनावर यशस्वीरित्या मात करत देवदत्त संघात परतला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता.