आफ्रिकेचा प्रतिभावान माजी खेळाडू एबी डीव्हिलियर्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०१८ साली तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली. आपण क्रिकेट खेळून थकलो आहोत त्यामुळे आता कुटुंबाला वेळ द्यायचा आहे असे कारण त्याने दिले. निवृत्तीनंतर डीव्हिलियर्स देशभरातील अनेक टी २० लीग स्पर्धांमध्ये खेळला. IPL 2019 मध्येही डीव्हिलियर्स पूर्णवेळ उपलब्ध होता. IPL 2020 मध्येदेखील डीव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहे. पण सध्या डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याचे बोलले जात आहे.

CoronaVirus : “भारतातून आला आहात… जरा लांबच राहा”

२०२० च्या शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियात टी २० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची कामगिरी फारच सुमार होती. त्यात आता हाशिम अमला, इम्रान ताहीर, जे पी ड्युमिनी हे खेळाडू देखील निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या कसोटीच्या काळात आफ्रिकेचा संघ आधाराच्या शोधात आहे. अशातच पुन्हा एकदा डीव्हिलियर्स संघात येणार का याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
डीव्हिलियर्स काय म्हणतो…

“धोनीचं ‘कमबॅक’ आता जरा कठीणंच आहे”

“थोडं थांबा आणि बघूया काय होतंय ते .. सध्या तरी माझं पूर्ण लक्ष हे IPL वर आहे. माझा संघ असलेल्या बंगळुरूला मला एक चांगली सुरुवात मिळवून द्यायची आहे आणि संघातील साऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. त्यानंतर मी शांतपणे बसेन. उर्वरित वर्षाचा आढावा घेईन आणि त्या नंतरच मग शक्य असेल तो अंतिम निर्णय घेईन”, असे सूचक उत्तर डीव्हिलियर्सने दिले आहे.

२०१९ च्या विश्वचषकानंतरही डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाची चर्चा झाली होती. त्यावेळी त्याने स्पष्टीकरण दिले होते. “मी निवृत्ती स्वीकारल्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या संपर्कात अजिबात नव्हतो. त्यांनीही मला कधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. माझा शाळकरी मित्र फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ उत्तम कामगिरी करत होता. विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर होण्याच्या २ दिवस आधी मी फाफशी संपर्क साधला, त्यावेळी त्याने मला काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची उत्तर देताना ‘जर संघाला गरज असेल तर आणि तरच मी संघासाठी उपलब्ध आहे’, असे उत्तर मी दिले. याबाबत पुढे काहीही चर्चा झाली नाही. पण भारताविरुद्ध स्पर्धेतील सलग तिसरा पराभव पत्करावा लागल्यानंतर अचानक माझ्या नावाचा बोभाटा होऊ लागला. काही लोकांनी दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीवर होणाऱ्या टिकेवरून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला. पण मी संघात पुनरागमन करण्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही”, असे स्पष्टीकरण डिव्हिलियर्सने दिले होते.