बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील सामना खऱ्या अर्थाने हाय व्होल्टेज ड्रामा ठरला. या सामन्यामध्ये धोनीने प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही चेन्नईचा एका धावेने पराभव झाला. शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या २६ धावांचा पाठलाग करताना धोनीने ५ चेंडूत २४ धावा फटकावल्या. मात्र अखेरच्या चेंडूवर यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने शार्दूल ठाकूरला चपळाईने बाद करून सामना बंगळुरूच्या नावे केला. मात्र त्याआधीच्या षटकामध्ये डेवेन ब्रॉवो धोनीबरोबर फलंदाजी करत असतानाही धोनीने दोन वेळा सिमेजवळ चेंडू गेला असतानाही धावा काढल्या नाहीत. त्या धावा धोनीने काढल्या असत्या तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे. मात्र धोनीने सिमेजवळ चेंडू जाऊनही धावा का काढल्या नाहीत यासंदर्भात सामन्यानंतर बोलताना धोनीने यामागील कराण स्पष्ट केले.

इयन बिशप यांनी सामन्यानंतर धोनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘तू त्या १९ व्या षटकामध्ये पळून धावा का काढल्या नाहीत? तसेच त्यावेळी तुझ्या मनात कोणते विचार सुरु होते?’ असा सवाल धोनीला केला. या प्रश्नांला उत्तर देताना धोनी म्हणाला, ‘शेवटच्या षटकांमध्ये अनेकदा अखूड टप्प्याचे चेंडू टाकले जातात. त्यातही मैदानात दवं होतं त्यामुळे चेंडू बॅटवर येत नव्हता. म्हणूनच चेंडूचा अंदाज नव्या खेळाडूला लावणे कठीण गेले असते. त्यावेळी मी ब्रॉवोपेक्षा जास्त वेळ मैदानात होतो आणि अधिक चेंडू खेळलो होतो म्हणून मीच मोठे फटके मारण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही सामना एका धावेने हरल्याने त्यावेळी आम्ही एक-दोन धावा धावायला हवं होतं असं वाटण सहाजिक आहे. पण त्यावेळ जर तेव्हा एक दोन निर्धाव चेंडू गेले असते तर काय झाले असते जर त्यानंतरच्या चेंडूंवर चौकार मारले गेले नसते तर काय? याचाही विचार करायला हवा. परिस्थिती लक्षात घेऊन मी धाव न घेण्याचा निर्णय घेतला होता.’

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ८४ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. पण धोनीने IPL कारकिर्दीतील इतिहास रचला. महेंद्रसिंग धोनीने ८४ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत ५ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. शेवटच्या षटकात तर त्याने ४, ६, ६, २ आणि ६ असे पहिले ५ चेंडू टोलवले, पण अखेरच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने शार्दूल ठाकूरला धावबाद केले आणि बंगळुरूचा विजय झाला.