हंगामातील पहिल्या विजयासाठी आसुसलेल्या बेंगळूरुसमोर दिल्ली कॅपिटल्सला नमवण्याचे आव्हान

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १२व्या हंगामाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले तरी कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही. सलग पाच सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे निदान युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला नमवून बेंगळूरु पराभवाची कोंडी फोडणार का, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत बेंगळूरुचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र अखेरच्या षटकांत आंद्रे रसेलने केलेल्या तुफानी फलंदाजीपुढे बेंगळूरुच्या गोलंदाजांची दैना झाली आणि पहिल्या विजयाचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. बेंगळूरुचा संघ तूर्तास गुणतालिकेच्या तळाला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांचा पुरेसा अनुभव असलेला विदेशी गोलंदाज बेंगळूरुकडे नसल्यामुळे त्यांची गोलंदाजी फारच कमकुवत वाटत आहे. टिम साऊदीच्या समावेशानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. त्याशिवाय आतापर्यंत बेंगळूरुच्या खेळाडूंनी तब्बल १३ झेल सोडले आहेत. त्यामुळे गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटकाही त्यांना पडला आहे.

फलंदाजीत कोहलीसह एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल हे सातत्याने योगदान देत आहेत. तसेच मार्कस स्टॉयनिस व मोईन अली यांसारख्या अष्टपैलूंच्या समावेशामुळे त्यांची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे. मात्र अली व स्टॉयनिस दोघेही गोलंदाजीत सुमार कामगिरी करत आहेत. त्यामुळे बेंगळूरुला संघप्रयोग करण्याबरोबरच सांघिक कामगिरीवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

दुसरीकडे बलाढय़ मुंबई इंडियन्स आणि कोलकाता यांना पराभूत करणाऱ्या दिल्लीने आतापर्यंत संमिश्र स्वरूपाची कामगिरी केली आहे. चार सामन्यांतून दोन विजय व तितक्याच पराभवांनिशी पाचव्या स्थानावर असणाऱ्या दिल्लीला श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. अनुभवी शिखर धवनदेखील धावांसाठी झगडताना दिसत आहे. गोलंदाजीत कॅगिसो रबाडा, ख्रिस मॉरिस व संदीप लामिछाने यांच्यावर दिल्लीची भिस्त आहे.

संघ

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, नॅथन कोएल्टर-नाइल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासीन (यष्टीरक्षक), मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.
  • दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारु अयप्पा, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स.

सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स आणि सिलेक्ट १