रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील बंगळुरूच्या मैदानावरील सामना सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मुसळधार पावसामुळे सामना ५-५ षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला होता, मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने अखेर हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला. परिणामी बंगळुरूचं स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आलं, तर राजस्थानचीही प्ले-ऑफ प्रवेशाची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. मात्र, या सामन्यात राजस्थानच्या श्रेयस गोपाळने हॅटट्रिक घेत विक्रमाला गवसणी घातली. आयपीएल कारकिर्दीतली त्याची ही पहिलीच हॅटट्रिक ठरली. त्याची ही हॅटट्रिक अनेक अर्थांनी खास ठरली.

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पावसाच्या हजेरीमुळं सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. काही तासांनी पाऊस थांबला तेव्हा हा सामना प्रत्येकी पाच षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरूच्या विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी वरुण अ‍ॅरोनच्या पहिल्याच षटकात 23 धावा चोपल्या. त्यानंतर दुसरं षटक फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाळ घेऊन आला. आक्रमक खेळणाऱ्या कोहलीने गोपाळच्या पहिल्या तीन चेंडूंवर षटकार, चौकार आणि दोन अशा एकूण 12 धावा काढल्या. मात्र त्यानंतर सामन्याचं चित्र पूर्णतः पालटलं. चौथ्या चेंडूवर त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोहलीला झेलबाद केलं. त्यानंतर पुढच्याच अर्थात पाचव्या चेंडूवर त्याने डिव्हिलियर्सलाही चकवलं, आणि षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गोपाळने मार्कस स्टॉइनिसलाही झेल देण्यास भाग पाडलं व आयपीएल कारकिर्दीतली पहिली हॅटट्रिक नोंदवली. एकाच सामन्यात कोहली आणि डिव्हिलिर्सला यांना बाद करण्याची गोपाळची ही तिसरी वेळ ठरली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. कोहली आणि एबीडी यांच्यासारख्या खेळाडूंना केवळ एकदा बाद करण्याचं अनेक गोलंदाज विशेषतः नवखे गोलंदाज स्वप्न पहात असतात, मात्र गोपाळने या दिग्गजांना तिसऱ्यांदा बाद तर केलंच याशिवाय आपली पहिली हॅटट्रिकही नोंदवली, त्यामुळेच त्याची ही हॅटट्रिक स्वप्नवत ठरते. राजस्थानकडून हॅटट्रिक नोंदवणारा गोपाळ चौथा गोलंदाज ठरला. यापूर्वी अजित चंडिला, प्रविण तांबे आणि शेन वॉटसन यांनी हा विक्रम केला होता.

सामना सुरू झाल्यावर विराटनं अवघ्या सात चेंडूंत २५ धावा ठोकल्या. त्यात तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. डिव्हिलियर्सनंही चार चेंडूंत १० धावा केल्या. दोघे बाद झाल्यानंतर मात्र, बेंगळुरू संघाची घसरगुंडी सुरू झाली. फलंदाज लागोपाठ बाद होत गेले. बेंगळुरूनं अखेर पाच षटकांत सात बाद ६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थाननेही आक्रमक सुरूवात केली. सलामीवीर संजू सॅमसनने १३ चेंडूंत २८ धावा फटकावल्या. तर लिविंगस्टननं सात चेंडूंत ११ धावा केल्या. संघाच्या ४१ धावा असताना सॅमसन बाद झाला. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि अखेर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. यासोबतच बंगळुरूचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले, तर राजस्थानचीही प्ले-ऑफ प्रवेशाची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.