चाचणी अहवाल नकारात्मक आलेल्या सिक्कीची संतप्त प्रतिक्रिया; सोमवारपासून फिजिओसह सराव शिबिरात सामील होणार

माझ्यामुळे सर्वाना करोनाची साथ पसरू शकते. मी घरीच थांबायला हवे होते, ही समाजमाध्यमावर लोकांची प्रतिक्रिया वाचली, तेव्हा धक्का बसला. मी अकादमीत सरावासाठी गेले होते. हॉटेलमध्ये मेजवानी झोडायला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया बॅडमिंटनपटू एन. सिक्की रेड्डीने व्यक्त केली.

दुसऱ्या करोना चाचणीचा अहवाल शनिवारी नकारात्मक आल्याने सिक्की आणि फिजिओथेरपिस्ट किरान छॅलागुंडला यांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेती २६ वर्षीय सिक्की आणि किरान यांना करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले होते. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाची (साइ) पुलेला गोपिचंद अकादमी निर्जंतुकीकरणासाठी बंद करण्यात आली. राष्ट्रीय शिबीरसुद्धा काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. शुक्रवारी दुसऱ्या चाचणीसाठी दोघेही खासगी इस्पितळात दाखल झाले होते. त्यामुळे सोमवारपासून ते दोघेही हैदराबादला सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन शिबिरात दाखल होऊ शकणार आहेत.

गोपिचंद अकादमीत सरावाला प्रारंभ करण्यापूर्वी २१ खेळाडू, प्रशिक्षक आणि साहाय्यकांच्या कोविड-१९ चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात सिक्की आणि किरान वगळता बाकी १९ जणांचे अहवाल नकारात्मक आले होते.

‘‘मला कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. त्यामुळे या प्रतिक्रियांचा मनस्तापच अधिक झाला. परंतु काही रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याचेही मला ज्ञात होते. पण लागण झाली असताना तीन तास मी कशी खेळू शकले, याचे आश्चर्य वाटले. माझ्या आईला मधुमेह आहे. पण माझ्या कुटुंबीयांपैकी कुणालाही लक्षणे आढळलेली नाहीत,’’ असे सिक्कीने सांगितले.

करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यापासून मला कुणाशीही बोलायची इच्छा नव्हती. समाजमाध्यमावरील मतांबाबत कोणती प्रतिक्रिया व्यक्त करावी, हेच कळत नव्हते. परंतु अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याने मी शांत राहणे पसंत केले!

-एन. सिक्की रेड्डी