News Flash

सीएम चषकाच्या थकबाकीची वसुली भाजप पदाधिकाऱ्यांकडून?

राज्यभरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सीएम चषकाचे आयोजन करण्यात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांचा निर्णय

जानेवारी महिन्यात भाईंदर येथे आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषक क्रीडा स्पर्धेसाठी मैदानात लावण्यात आलेल्या स्टॉल्सचे संपूर्ण शुल्क भारतीय जनता पक्षाने महापालिकेकडे भरलेले नाही. त्यामुळे या थकबाकीची वसुली भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता करात ही रक्कम जोडण्यात यावी असा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. परंतु हा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर जाणार असून स्थायी समितीने मान्यता दिली तरच ही रक्कम पदाधिकाऱ्यांच्या करात समाविष्ट केली जाणार आहे. मात्र स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे बहुमत असल्याने हा प्रस्ताव नाकारला जाण्याचीच शक्यता अधिक आहे.

राज्यभरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सीएम चषकाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघासाठी भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भाजपने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी मैदानात ठिकठिकाणी स्टॉल्स उभारण्यात आले होते. मैदानाच्या भाडय़ाव्यतिरिक्त या स्टॉलसाठीदेखील महापालिकेने शुल्क आकारणी केली होती.

परंतु हे शुल्क अवाजवी असल्याचे सांगत भाजपने संपूर्ण शुल्काचा भरणा केला नाही. याबाबत आयुक्तांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने या रकमेची थकबाकी भाजपकडे असल्याचे घोषित केले होते. परंतु त्यानंतरही भाजपकडून या रकमेचा भरणा करण्यात आला नाही.

याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी रकमेच्या वसुलीसाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर आयुक्तांनी थकबाकीची रक्कम भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्या मालमत्ता करात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव करून त्याबाबतची नोटीस भाजपला पाठवली आहे. परंतु नोटीशीला उत्तर देताना भाजपने ही रक्कम अवास्तव असल्याचा दावा केला आहे.

मुळात स्पर्धेसाठी ज्या दिवसांसाठीची परवानगी घेण्यात आली आहे, त्या दिवसांचे स्टॉलचे पूर्ण शुल्क भरण्यात आले आहे. ज्या दिवशी स्पर्धा नव्हती, त्या दिवशीचे शुल्क आकारणे चुकीचे आहे. स्पर्धा शहरातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली होती आणि स्टॉल्सदेखील खेळाडूंच्या विश्रांतीसाठी उभारण्यात आले होते, त्या ठिकाणी कोणतीही व्यावसायिक उलाढाल करण्यात आली नव्हती, असा खुलासा भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी केला आहे.

भाजपने याबाबतचे आपले म्हणणे मांडले आहे. आता या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी तो स्थायी समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात येईल आणि समिती ज्याप्रमाणे निर्णय घेईल, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 1:46 am

Web Title: reactor of cm chashak recovery from bjp office bearers
Next Stories
1 रोममध्ये विल्यम्स भगिनीद्वंद्व!
2 सुवर्णकाळ परतणार?
3 विश्वचषक युद्धासाठी भारत शस्त्रसज्ज!
Just Now!
X