इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला फक्त दोन दिवस बाकी असताना भारतीय संघ बदला घेण्यासाठी उत्सुक आहे. परंतु इंग्लंडचा यष्टीरक्षक मॅट प्रायरने मात्र स्पष्ट केले आहे की, भारतातील खडतर आव्हानासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
‘‘आम्ही भारत दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सर्वतोपरी तयारी केली आहे. आता प्रत्यक्ष लढाई मैदानावरच असेल. पण आम्ही सर्वासाठी हे कठीण आव्हान असेल,’’ असे प्रायर म्हणाला. भारत-इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला १५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे.
‘‘भारतीय भूमीवर पाऊल ठेवण्यापूर्वी आम्ही बरीच पूर्वतयारी केली आहे. या प्रकारच्या खेळपट्टीवर आम्ही बराच सराव केला आहे. उष्ण वातावरण, फिरकी खेळपट्टय़ा आदी सर्व गोष्टींचा आम्ही चांगला अभ्यास केला आहे,’’ असे प्रायरने सांगितले.
‘‘भारतात येऊन खेळणे हे नेहमीच आव्हानात्मक सिद्ध झाले आहे. भारताला आपल्या येथील वातावरणाची पूर्ण माहिती आहे. आम्ही जसे इंग्लिश वातावरणात स्विंग चेंडूंचा आरामात सामना करू शकतो. तसेच येथील खेळाडू फिरकीचा सहज सामना करतात,’’ असे प्रायर म्हणाला.