करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका भारतात आयपीएल या स्पर्धेलाही बसला. बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत तेरावा हंगाम स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे. बुधवारी आयसीसीच्या बैठकीत ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियातील प्रस्तावित टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल निर्णय घेणं अपेक्षित होतं. परंतू आयसीसीने हा निर्णय एक महिना पुढे ढकलला आहे. तरीही बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएलचा तेरावा हंगाम यंदाच्या वर्षातच खेळवला जाईल असं सूतोवाच केलं होतं. यानंतर आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनीही, तेराव्या हंगामासाठी बीसीसीआय सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

“आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने निर्णय घेतल्यानंतरच आम्ही याबद्दल अधिकृतरित्या आयोजन करायला घेऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे येत्या महिन्या भराच्या काळात आयसीसी टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेईल. आमच्याकडून सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात तेरावा हंगाम खेळवण्याची तयारी सुरु आहे.” पटेल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली. यासाठी प्राथमिक स्वरुपाचं नियोजन करण्यात आलेलं असून अंतिम तयारी ही आयसीसीने टी-२० विश्वचषकानंतर निर्णय घेतल्यानंतरच करण्यात येईल असं पटेल यांनी सांगितलं. २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे अखेरीस बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून आयपीएल २०२० साठी सज्ज रहायला सांगितलं आहे. स्पर्धा खेळवण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे. प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवायला लागली तरीही बीसीसीआयची तयारी असल्याचं गांगलीने राज्य संघटनांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे येत्या महिन्याभराच्या काळात टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.