‘भारतीय क्रिकेटमध्ये जे काही वाईट घडते त्यासाठी मला जबाबदार धरले जाते. वाईटसाठी मीच कारणीभूत असा समज आहे. मी माझ्या खेळाचा आनंद घेतो आहे. कर्णधारपदावरून माझी हकालपट्टी करून संघाचे भले होणार असेल तर मी आनंदाने हे पद सोडेन,’ असे उद्गार भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काढले. बांगलादेशविरुद्धची दुसरी लढत गमावल्यामुळे भारतीय संघाने एकदिवसीय मालिका गमावली. त्या पाश्र्वभूमीवर धोनी बोलत होता. बांगलादेशविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत झाल्याने धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धोनी पुढे म्हणाला, ‘केवळ खेळाडू म्हणून खेळायला मला आवडेल. संघ विजयी होणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. संघाच्या विजयात योगदान देणे महत्त्वाचे आहे, कर्णधार कोण याने फरक पडत नाही. कर्णधारपदासाठी मी कधीही शर्यतीत नव्हतो. मला ही जबाबदारी देण्यात आली. ती मी स्वीकारली आहे. मी या भूमिकेला न्याय देऊ शकत नाही, असे निवड समितीला वाटले तर ते योग्य निर्णय घेतील. मला त्यात काही वावगे वाटणार नाही’.
रहाणेऐवजी रायुडूचा समावेश योग्यच
संथ खेळपटय़ांवर रहाणेला स्थिरावणे कठीण जाते. वेगवान खेळपट्टीवर रहाणे सुरेख खेळतो. खेळपट्टी धीमी असेल आणि रहाणे चौथ्या किंवा पाचव्या क्रमाकांवर फलंदाजीला आला असेल तर धावांसाठी त्याला संघर्ष करावा लागला आहे. एकेरी-दुहेरी धावा ढकलत धावफलक हलता ठेवणे त्याला कठीण जाते. डावाची सुरुवात करताना तो अडळखतो. रायुडू संथ खेळपट्टीवरही चांगला खेळू शकतो. म्हणूनच अंतिम अकरांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.

माजी खेळाडूंचा धोनीला पाठिंबा
धोनीला कर्णधारपदावरून काढण्याची काहीही आवश्यकता नाही. धोनीच्या नेतृत्वामध्येच भारतीय संघाने विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. विश्वचषकानंतरची ही पहिलीच मालिका आहे. एवढय़ा घाईने धोनीसंदर्भात निर्णय  येऊ नये.
-दिलीप वेंगसरकर

एका खेळाडूला दोष देण्यात अर्थ नाही. संपूर्ण संघाच्या कामगिरीत शैथिल्य होते. धोनीने याआधीच कसोटी कर्णधारपद सोडले आहे. कारकीर्दीत पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलताना तो उद्वेगाने बोलला. त्याची निराशा लपत नव्हती. हे चांगले लक्षण नाही.
-बिशनसिंग बेदी

एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात नेतृत्व करण्यासाठी धोनी हाच योग्य पर्याय आहे. बांगलादेशला पुरेशा गांभीर्याने न घेण्याची चूक आपल्याला भोवली. या मालिकेकरिता तयारी करण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही.
-अजित वाडेकर

एखाद्या मालिकेत पराभव झाल्याने धोनीच्या नेतृत्वावर टीका करणे योग्य नाही. इंग्लंड संघानेही कर्णधारांमध्ये बदल केले. मात्र हे डावपेच यशस्वी ठरले नाहीत. मोठा पराभव पदरी पडल्यानंतर कर्णधाराला तोफेच्या तोंडी दिले जाते. पराभव खेळाचा भाग आहे.
-सय्यद किरमाणी