News Flash

युजवेंद्र चहल म्हणतो, कसोटी क्रिकेटसाठी लागणारा संयम माझ्याकडे आहे !

वन-डे, टी-२० खेळणाऱ्या चहलला अद्याप कसोटी संघात स्थान नाही

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू घरी बसून होते. आयसीसीने सरावाला परवानगी दिल्यानंतर खेळाडूंनी सर्व नियम पाळत सराव सुरु केला आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही सराव सुरु केला आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकी जोडगोळीने गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. आश्विन आणि जाडेजा यांना मागे टाकत आता चहल-कुलदीप संघाचे नियमीत सदस्य बनले आहेत. यापैकी कुलदीप यादवने भारतीय कसोटी संघातही स्थान मिळवलं, परंतू युजवेंद्र चहलला अद्याप ही कामगिरी जमलेली नाही. परंतू आता आपण कसोटी क्रिकेटसाठी तयार असल्याचं चहलने म्हटलंय.

“सध्या मी घरातून माझा रोजचा सराव आणि जिममध्ये मेहनत घेतो आहे. काही दिवसांपूर्वी मी घराजवळच्या मैदानावर सरावासाठी गेलो होतो. ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ मी घरात बसून होतो त्यामुळे मला काहीही करुन घराबाहेर जायचं होतं. मी ४-५ षटकं टाकली. मला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. आयपीएल स्पर्धा पार पडणार आहे याचा मला आनंद आहे.” चहल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होता. कसोटी संघात चहलला अद्याप स्थान मिळालं नाही. भविष्यात भारतीय कसोटी संघाकडून खेळण्याच्या इच्छेबद्दल विचारलं असता चहलने आपण कसोटी क्रिकेटसाठी सज्ज असल्याचं सांगितलं.

“गेल्या ८ रणजी सामन्यांमध्ये मी ४६ बळी घेतले. त्या सामन्यांमध्ये मी २०-२५ षटकांचे स्पेल टाकले आहेत. कसोटी क्रिकेट, वन-डे क्रिकेट असा फरक मी कधीच करत नाही. मी फक्त मैदानावर जातो आणि खेळाचा आनंद घेतो. ज्यावेळी संधी येते त्यावेळी तिचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी आतापर्यंत वन-डे आणि टी-२० क्रिकेट खेळलो आहे. पण जेव्हा कोणीतरी तुम्हाला कसोटी खेळणारा क्रिकेटपटू असं म्हणतं ती भावना काही वेगळीच असते. वन-डे, टी-२० मध्ये फलंदाज तुमच्या प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार ठोकण्याच्या तयारीत असतो आणि त्याला तुम्हाला थांबवायचं असतं. पण कसोटी क्रिकेटमध्ये तुमचा खरा कस लागतो. माझ्यामते कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी लागणारा संयम आणि गुणवत्ता माझ्याकडे आहे.” युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळतो. याशिवाय लॉकडाउन काळात चहल सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 4:17 pm

Web Title: ready to play test cricket says indian spinner yuzvendra chahal psd 91
Next Stories
1 काश्मीर वादाच्या प्रश्नावर आफ्रिदीचं उत्तर, म्हणाला…
2 Video : घालीन लोटांगण… गोलंदाजाचा खतरनाक यॉर्कर अन् फलंदाज ‘क्लीन बोल्ड’
3 नरेंद्र मोदींचं वय ६९…तरीही देश चालवतायत, मग त्यांनी निवृत्त व्हायचं का??
Just Now!
X