गतविजेत्या रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत चौथा विजय मिळवत १९व्यांदा बाद फेरीत प्रवेश केला आहे. करीम बेंझेमाने केलेल्या गोलमुळे रिअल माद्रिदने लिव्हरपूलचा १-० असा पराभव करून दोन सामने शिल्लक राखत अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवले आहे. २०१३मध्ये अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या बोरुसिया डॉर्टमंडनेही आगेकूच केली आहे.
ब गटात चौथा विजय मिळवत रिअल माद्रिदने सर्व स्पर्धामधील सलग १२व्या विजयाची नोंद केली. पहिल्या सत्रात २७व्या मिनिटाला गोल करणारा बेंझेमा रिअल माद्रिदच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सध्या फॉर्मात नसलेल्या बोरुसिया डॉर्टमंडने गॅलाटासरे संघाचा ४-१ असा पाडाव करून उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या रिअल माद्रिदने दोन आठवडय़ांपूर्वी लिव्हरपूलला ३-० असे हरवले होते. पण या सामन्यात लिव्हरपूलचे प्रशिक्षक ब्रेंडन रॉजर्स यांनी कर्णधार स्टीव्हन गेरार्ड आणि रहीम स्टर्लिग यांना विश्रांती दिली होती. २७व्या मिनिटाला मार्सेलोच्या क्रॉसवर बेंझेमाने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत रिअल माद्रिदला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी माद्रिदला विजय मिळवण्यासाठी पुरेशी ठरली. त्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोला चॅम्पियन्स लीगमधील सर्वाधिक ७१ गोलांचा विक्रम मोडण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या विजयासह रिअल माद्रिदने १२ गुणांसह ब गटात अव्वल स्थान प्राप्त केले. बसेल एफसीने लुडोगोरेट्स रॅडग्रॅडचा ४-० असा पराभव करून ६ गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले. लिव्हरपूल ३ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.