गतविजेत्या रिअल माद्रिदला यंदाच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या मुकाबल्यात तुल्यबळ बायर्न म्युनिकचा सामना करावा लागणार आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या लिस्टर सिटीसमोर अ‍ॅटलेटिको माद्रिदचे आव्हान असणार आहे. बार्सिलोना आणि ज्युव्हेंटस तर बोरुसिया डॉर्टमंड आणि मोनॅको यांच्यात लढत होणार आहे.

गतविजेत्या आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या रिअल माद्रिदचा सामना करणे आव्हानात्मक आहे. मात्र चॅम्पियन्स लीगसारख्या मोठय़ा स्पर्धेत बलाढय़ संघांशी टक्कर द्यावी लागणे स्वाभाविक आहे. या लढतीपूर्वी इंग्लिश प्रीमिअर लीगचे सामनेही आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत.

प्रीमिअर लीग स्पर्धेचे जेतेपद नावावर असणाऱ्या लिस्टरसिटीने सेव्हिलावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. लिस्टर संघासाठी चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद खडतर आव्हान आहे. मात्र चमत्कार घडवण्यासाठी प्रसिद्ध लिस्टरला कमी लेखण्याची चूक करणे अ‍ॅटलेटिकोला महागात पडू शकते.

बार्सिलोनाने २०१५मध्ये ज्युव्हेंटसला नमवतच जेतेपदाची कमाई केली होती. त्या सामन्यानंतर ज्युव्हेंटसचा संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळतो आहे. ज्युव्हेंटसचा संघ सीरी ए स्पर्धेचे सलग सहावे जेतेपद पटकावण्यासाठी आतूर आहे. जेतेपदांचा दुहेरी योग साधण्याची संधी ज्युव्हेंटस संघाकडे आहे.

बायर्न म्युनिकची प्रशिक्षकपदाची धुरा कार्लो अ‍ॅन्कलोटींकडे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एसी मिलान संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेची दोन जेतेपद पटकावली. त्यानंतर त्यांनी रिअल माद्रिदला जेतेपद मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. या हंगामात बायर्न म्युनिकला जेतेपद पटकावण्यासाठी त्यांची भूमिका कळीची ठरू शकते.

उपांत्यपूर्व फेरी

  • १२ एप्रिल- रात्री १२.१५ वा.
  • ज्युव्हेंटस वि. बार्सिलोना
  • बोरुसिया डॉर्टमंड वि. मोनॅको
  • १३ एप्रिल- रात्री १२.१५ वा.
  • बायर्न म्युनिक वि. रिअल माद्रिद
  • अ‍ॅटलेटिको माद्रिद वि. लिस्टरसिटी