आणखी एक पराभव आणि रिअल माद्रिद क्लबची ला लिगा फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत पीछेहाट. सध्या माद्रिद क्लबची अवस्था छिद्र पडत चाललेल्या नावेसारखी आहे. एक विजयाचा आनंद मिळतो तोच पुढे पराभव. त्यामुळे ते प्रवास करत असलेली नाव सतत डुलतेय.  कोपा डेल रे, चॅम्पियन्स ट्रॉफी आदी स्पर्धामध्ये त्यांची वाटचाल सुरू आहे पण त्यांच्या होमपीचवर म्हणजे ला लिगामध्ये त्यांना अजून सूर सापडलेला नाही. या अपयशाचे खापर कुणावर तरी फुटणे साहजिक आहे. पण हे साहजिक वाटणारे खापर झिनेदिन झिदान यांच्या प्रशिक्षणावर प्रश्न उपस्थित करणारे असेल तर ही बाब गंभीर आहे.

दोन वर्षांपूर्वी झिदान यांनी माद्रिद क्लबच्या प्रशिक्षकांची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. स्पेनमधील या बलाढय़ क्लबची सूत्रे हातात घेताना समोर असलेल्या आव्हानांची त्यांना जाण होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर मार्गदर्शन करण्याची पहिली वेळ असूनही त्यांनी मोठय़ा आत्मविश्वासाने ते आव्हान स्वीकारले. ज्या क्लबमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे त्या क्लबला मार्गदर्शन करणे म्हणजे सोपी गोष्ट असे सगळ्यांना वाटत होते. पण हीच बाब आता त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे.

मागील २२ महिन्यांत १० पैकी आठ जेतेपदांवर नाव कोरण्यात माद्रिदला यश मिळाले ते झिदान यांच्यामुळेच. पण त्यात सिंहाचा वाटा होता तो रोनाल्डोचा. त्याने आपल्या कारकिर्दीत कदाचित सर्वोत्तम खेळ या २२ महिन्यांत केला असावा. त्यामुळेच माद्रिद आणि झिदान हे यशोशिखरावर आरूढ झाले. पण हाच रोनाल्डो सध्या सातत्यपूर्ण कामगिरीशी झगडत आहे आणि त्याचा परिणाम क्लबच्या व अन्य खेळाडूंच्या कामगिरीवर होताना जाणवत आहे. पण याचा सर्वाधिक फटका झिदान यांना बसत आहे. त्यांच्या मार्गदर्शन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना स्वत:सह रोनाल्डोच्या बचावाची दुहेरी परीक्षा द्यावी लागत आहे. पण कुणीच रोनाल्डोला जाब विचारत नाही. टीकेचा रोख झिदान यांच्या दिशेने आहे. मुळात झिदान एकटे दोषी नाहीत. याचा अर्थ असा नाही की त्यांचा काहीच दोष नाही.  क्लबच्या यशाचे श्रेय जसे प्रशिक्षकांना दिले जाते तशी अपयशाची जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी. पण या यश- अपयशाची वाटणी ही समसमान व्हायला हवी. अपयश आले की केवळ प्रशिक्षकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे आणि तेही झिदानसारख्या दिग्गज खेळाडूला हे चुकीचे आहे.

मागील मोसमात अनेक जेतेपदांची माळ गळ्यात पाडून घेणाऱ्या झिदान यांची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. खेळाडूंकडून त्यांना हवी तशी साथ मिळत नाही आणि झिदान यांचे डावपेचही फारसे उपयोगी पडत नाहीयेत. या अपयशामागचे प्रमुख कारण म्हणजे कमकुवत बचाव. माद्रिदला मागील १८ सामन्यांत १७ गोल खावे लागले. हा आकडा मोठा नसला तरी माद्रिदला चिंता करावा लागणारा नक्की आहे. गेल्या आठवडय़ात व्हिलारिअलने त्यांना १-० असे पराभूत केले. सेल्टा व्हिगोविरुद्ध आघाडीवर असूनही त्यांना २-२ अशी बरोबरी स्वीकारावी लागली. वेलेंसिया, जिरोना, मलगा आणि बार्सिलोना यांनी तर माद्रिदविरुद्ध एकाहून अधिक गोल केले. तर कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेतही फुलाब्रॅड आणि न्यूमांसिया या कमकुवत क्लब्सनेही माद्रिदची बचावफळी सहज भेदली.

डॅनी काव्‍‌र्हाजल आणि मर्सेलो हे फुल बॅक स्थानासाठी माद्रिदचे प्रमुख खेळाडू आहेत. मात्र आक्रमणपटूला पोषक असा खेळ त्यांच्याकडून अद्याप झालेला नाही. या जोडीचा मागील मोसमात १६ गोल्समध्ये थेट सहभाग होता, परंतु या मोसमात ते  निष्प्रभ ठरले आहेत. १९ वर्षीय चराफ हाकिमी बॅक म्हणून आश्वासक खेळ करत असला तरी उजव्या बाजूने आक्रमण करण्याची रणनीती माद्रिदने फार क्वचित अवलंबली आहे. त्यात छोटे छोटे पास देऊन प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवण्यात माद्रिदच्या खेळाडूंना  अपयश येत आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम गोलसंख्येवर जाणवत आहे. माद्रिदने मागील मोसमात १०६ गोल्स केले आहेत. त्यापैकी सर्वाधिक २५ गोल्स हे रोनाल्डोने केले, तर अल्व्हारो  मोराटा, करीम बेंझेमा आणि इस्को यांनीही दोन आकडी गोल्स केले. पण यंदा ही गोल सरासरी २.८ वरून १.९ वर आली. एकाही खेळाडूला चारहून अधिक गोल करता आलेले नाही.

झिदान अजूनही खेळाडूंच्या कौशल्यावर विसंबून आहे आणि म्हणून झिदान खेळातील त्रुटी शोधून त्यावर काम करताना दिसत नाही. आक्रमणपटूंचं अपयश ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोनाल्डो, इस्को, गॅरेथ बॅले आणि मार्को असेंसिओ यांनी प्रत्येकी चार गोल केले, तर बेंझेमाच्या नावे दोन गोल आहेत. बॅले दुखापतग्रस्त असल्याचा फटका माद्रिदला बसतोय. त्याचबरोबर गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यात खेळाडू अपयशी ठरत आहेत. त्यामुळे झिदान यांना प्लॅन बी तयार करायला हवा. अन्यथा एका चांगल्या प्रशिक्षकाच्या सेवेला माद्रिदला मुकावे लागेल. पण झिदान अजूनही आशावादी आहेत. त्यांचा क्लब जेतेपदाच्या शर्यतीत परतेल, असे त्यांना वाटते. खेळाडूंनी सांघिक वृत्ती दाखवली तर ते शक्य आहे.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा