News Flash

सोळावं जेतेपद मोक्याचं!

बेन्झेमाच्या दुहेरी गोलमुळे रेयाल माद्रिद सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

विजयाचा आनंद साजरा करताना रेयाल माद्रिदचा संघ.

बेन्झेमाच्या दुहेरी गोलमुळे रेयाल माद्रिद सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

उपांत्यपूर्व फेरीत उत्तरार्धातील पेनल्टीने रेयाल माद्रिदला तारले होते, तर आता गोलरक्षकाची चूक त्यांच्या पथ्यावर पडली. असंख्य अडचणींवर निर्धाराने मात करीत रेयालने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीचा टप्पा गाठला. घरच्या मैदानावर माद्रिदचा संघ सुरुवातीला पिछाडीवर पडला, मात्र तरीही खचून न जाता बायर्न म्युनिचला उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात २-२ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे एकूण ४-३ अशा गोलफरकाने सलग तिसऱ्यांदा आणि एकंदर सोळाव्यांदा रेयालने चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. दोन गोल साकारणारा करिम बेन्झेमा रेयालच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

सलग दुसऱ्या सामन्यात रेयालचा आधारस्तंभ ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खात्यावर एकही गोल जमा नव्हता. मात्र मंगळवारी रात्री माद्रिदला बायर्नचा गोलरक्षक स्वेन उलरिचच्या चुकीमुळे सावरता आले. हाच दुसरा गोल उपांत्य सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

सँतियागो बर्नाबीयू स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्या जोशुआ किमिचने तिसऱ्याच मिनिटाला आश्चर्यकारक गोल साकारत बायर्नला आघाडी मिळवून दिली. त्यावेळी बायर्नचे पारडे जड आहे, असे वाटत होते. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रोनाल्डोने भरपाई वेळेत पेनल्टीद्वारे साकारलेल्या गोलमुळे रेयालाने युव्हेंटसला धक्का दिला होता. या सामन्यात मात्र यजमान संघाने तितका वेळ दवडला नाही. ११व्या मिनिटाला मार्सेलोच्या क्रॉसवर बेन्झेमाने हेडरद्वारे संघाला बरोबरी साधून दिली. मग दुसऱ्या सत्रात बेन्झेमाने उलरिचच्या चुकीचा फायदा घेत अप्रतिम गोल केला. सामन्यातील रंगत मात्र इथेच संपली नाही. रेयालचा माजी खेळाडू जेम्स रॉड्रिगेझने ६३व्या मिनिटाला गोल करीत बायर्नला बरोबरी साधून दिली. त्यामुळे रेयालवर अखेरच्या सेकंदापर्यंत दडपण कायम होते. मात्र बायर्नसाठी ते पुरेसे नव्हते. स्पॅनिश क्लबने सलग तिसऱ्यांदा त्यांचा मार्ग संपुष्टात आणला.

गेल्या आठवडय़ात उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात रेयालने २-१ असा विजय मिळवला होता. याच कामगिरीमुळे दुसऱ्या टप्प्यातील बरोबरीही त्यांना तारणारी ठरली. आता अंतिम फेरीत रेयालची लिव्हरपूल आणि रोमा यांच्यातील विजेत्या संघाशी गाठ पडेल. लिव्हरपूलने पहिला सामना ५-२ असा जिंकून आपली दावेदारी भक्कम केली आहे.

‘‘सुरुवातीला आम्हाला झगडावे लागले. तिसऱ्याच मिनिटाला गोल पत्करल्यामुळे आम्हाला दर्जाला साजेसा खेळ दाखवता आला नाही. मात्र दुसऱ्या सत्रात आम्ही आत्मविश्वासाने कामगिरी केली. दुसऱ्या सत्रात बेन्झेमाने दिमाखदार गोल केला,’’ असे रेयाल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदानने सांगितले.

बेन्झेमाला सुरुवातीपासून खेळायची संधी नियमित मिळाली नाही. कारण प्रतिस्पध्र्याना आश्चर्याचा धक्का देण्याच्या हेतूने झिदान त्याला नंतर उतरवतो. त्यामुळे विविध स्पर्धामधील याआधीच्या १२ सामन्यांमध्ये त्याला एकमेव गोल साकारता आला होता.

रेयाल माद्रिदने १६व्यांदा चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली आहे. यापैकी १२ विजेतेपद आणि ४ उपविजेतेपदे त्यांना मिळवता आली आहेत. १९५६ ते १९६० अशा पहिल्या पाच स्पर्धा रेयालने जिंकल्या आहेत. युव्हेंटसने १९९६-९८ या कालावधीत सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर प्रथमच माद्रिदला ही किमया साधता आली आहे.

मागील पाचपैकी चार चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये बायर्न म्युनिच संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले आहे. याविरुद्ध रेयाल माद्रिदला पाच हंगामांपैकी चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी मिळाली आहे. रेयाल माद्रिदच्या कारकीर्दीतील हा चॅम्पियन्स लीगमधील २५०वा सामना ठरला.

आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी नसते. फुटबॉल हा खेळ नेमके हेच सांगतो. त्यामुळे त्याच्या परिणामांसाठी सज्ज राहावे लागते. ही तर चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी आहे. ही जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढणे स्वाभाविक आहे.    -झिनेदिन झिदान, रेयाल माद्रिदचे प्रशिक्षक

दोन्ही उपांत्य सामन्यांमध्ये आमचा संघ सरस होता आणि वर्चस्वपूर्ण खेळ साकारता आला. मात्र तरीही अंतिम फेरी गाठण्यात आम्ही अपयशी ठरलो. रेयालच्या विजयाचे श्रेय त्यांचा गोलरक्षक किलर नवासला जाते. सामन्याच्या उत्तरार्धातील त्याचा खेळ हा लक्षवेधी होता.   -जप हेन्कीस, बायर्न म्युनिचचे प्रशिक्षक

उपांत्य फेरीचा विजय हा माझ्यासाठी आणि संघातील प्रत्येकासाठी सुखद ठरला.   -करिम बेन्झेमा, रेयाल माद्रिदचा खेळाडू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 2:08 am

Web Title: real madrid in champions league football
Next Stories
1 दिवस-रात्र कसोटी सामन्यावरुन, बीसीसीआय-क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डांमध्ये जुंपली
2 आता दर दोन वर्षांनी होणार फुटबॉल मिनी-विश्वचषक?
3 आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी – सुनीता लाक्राकडे महिला हॉकी संघाचं नेतृत्व
Just Now!
X