रिअल माद्रिदने मलगा संघावर २-१ असा विजय मिळवत सर्व प्रकारच्या स्पर्धामध्ये सलग १६वा विजय मिळवत क्लब फुटबॉलच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली आहे. या विजयासह रिअल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाला पाच गुणांच्या फरकाने मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर रिअल माद्रिदने विजयीधडाका कायम ठेवला आहे. करिम बेंझेमाने १८व्या मिनिटाला रिअल माद्रिदचे खाते खोलले. बेंझेमाचा हा या मोसमातील १८वा गोल ठरला. मलगाचा गोलरक्षक कालरेस कामेनी याने सुरेख कामगिरी करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे या मोसमात पहिल्यांदाच रोनाल्डोने एखाद्या सामन्यात गोल करता आला नाही. सामना संपायला सात मिनिटे शिल्लक असताना गॅरेथ बॅलेने अप्रतिम गोल करून माद्रिदला २-० असे आघाडीवर आणले. त्यातच मलगाचा मधल्या फळीतील खेळाडू इस्को याला रेफ्रींनी लाल कार्ड दाखवले. त्यामुळे रिअल माद्रिदचा विजय निश्चित मानला जात होता. भरपाई वेळेत मलगाच्या रोके सांताक्रूझने गोल करून सामन्यात रंगत आणली. पण २-१ अशा फरकासह रिअल माद्रिदने विजयाची नोंद केली.