’गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम ’सेव्हिलाकडून रिअल पराभूत
ढिसाळ खेळ आणि फसलेल्या रणनीतीचा फटका रिअल माद्रिदला बसला. तुलनेने दुबळ्या सेव्हिलाकडून ला लिगा फुटबॉल स्पध्रेत माद्रिदला ३-२ असा पराभव पत्करावा लागला. माद्रिदच्या पराभवामुळे बार्सिलोनाचे स्पर्धेतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. नेयमारच्या बहारदार खेळाच्या जोरावर बार्सिलोनाने रविवारी व्हिलारिअल क्लबवर ३-० असा विजय मिळवत तीन गुणांची कमाई केली होती. मात्र, माद्रिदने सोमवारी विजय मिळवला असता तर त्यांना अव्वल स्थान मिळाले असते. पण, पराभवामुळे त्यांना अव्वल स्थानाने हुलकावणी दिली.

माद्रिद-सेव्हिला लढतीपूर्वी ला लिगाच्या गुणतालिकेत २७ गुणांसह बार्सिलोना अव्वल तर माद्रिद २४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. सेव्हिलाविरुद्धच्या विजयानंतर माद्रिदला अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी होती, परंतु त्यांनी ती गमावली. २२व्या मिनिटाला सर्गिओ रामोसने गोल करून माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीमुळे माद्रिदकडून अतिउत्साहात ढिसाळ खेळ झाला. त्याचा फायदा उचलताना ३६व्या मिनिटाला सिरो इमोबिलने सेव्हिलाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत सामना याच बरोबरीत होता, परंतु दुसऱ्या सत्रात अवघ्या १४ मिनिटांत सेव्हिलाकडून दुसरा गोल झाला. इव्हर बॅनेगाने सेव्हिलासाठी दुसरा गोल करून सामन्यात आघाडी घेतली. यानंतर माद्रिदकडून आक्रमक खेळ झाला खरा, परंतु तोपर्यंत सेव्हिलाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. ७४व्या मिनिटाला फर्नाडो लोरेंटेच्या गोलने सेव्हिलाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. ९०व्या मिनिटालो जेम्स रॉड्रिगेझच्या गोलने माद्रिदला दिलासा दिला, परंतु पराभव टाळण्यासाठी तो गोल पुरेसा नव्हता.