सातत्याने विविध स्पर्धामध्ये जेतेपदापासून दुरावलेल्या रिअल माद्रिदने काही कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. संघाकडून अपेक्षित प्रदर्शन करून घेण्यात अपयशी ठरलेल्या प्रशिक्षक कालरे अँसेलोटी यांना पदावरून डच्चू देण्याचा निर्णय रिअल माद्रिद व्यवस्थापनाने घेतला. प्रशिक्षकांची हकालपट्टी करण्यासाठी ओळखले जाणारे क्लब अध्यक्ष फ्लोरेंटीनो पेरेझ यांनी याबाबतची घोषणा केली. २०१४-१५ सत्रात रिअलला एकही जेतेपद पटकावता आले नाही. 

५५ वर्षीय अँसेलोटी यांच्या मार्गदर्शनाखाली गत सत्राच्या अखेरीस माद्रिदने दहाव्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले होते. पेरेझ यांनी सांगितले की, ‘‘या दोन वर्षांच्या कालावधीत कार्लो अँसेलोटी यांना क्लबकडून, माझ्याकडून आणि चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. मात्र, माद्रिदच्या फार अपेक्षा आहेत आणि नवीन चेहऱ्याला संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आम्हाला वाटते. त्यामुळे क्लबच्या सदस्यांनी अँसेलोटी यांच्याकडून पदभार काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.’’
या सत्रात माद्रिदला ‘ला लिगा’ स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या उपांत्य फेरीत यूव्हेंटस संघाकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. तसेच अ‍ॅटलेटिको माद्रिदने कोपा डेल रे स्पध्रेतून माद्रिदला बाहेरचा रस्ता दाखविला होता.
असे असले तरी संघातील बहुतेक खेळाडूंना अँसेलोटींनीच प्रशिक्षकपदावर कायम राहावे, असे वाटत असल्याचा दावा स्थानिक वृत्तपत्रांनी केला आहे. क्लबचा स्टार खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो याने अँसेलोटी यांना पाठिंबा दर्शविला होता. ‘‘सर्वोत्तम प्रशिक्षक आणि त्याहून अधिक चांगला माणूस. आशा
करतो की, अँसेलोटीसोबत पुढील वर्षीही खेळण्याची संधी मिळेल,’’ असे ट्विट रोनाल्डोने प्रसारमाध्यमावर केले होते.

माझ्याकडे आता केवळ रिअल माद्रिद संघासोबत घालवलेल्या दोन वर्षांच्या आठवणी राहिल्या आहेत. क्लब, चाहते आणि माझ्या खेळाडूंचे आभार. मला इटली, इंग्लंड आणि जर्मनीच्या क्लबचे प्रस्ताव आहेत.
कार्लो अँसेलोटी

माद्रिदसोबतची जेतेपदे
चॅम्पियन्स लीग : २०१३-१४
यूईएफए सुपर चषक : २०१४
फिफा क्लब विश्वचषक : २०१४
कोपा डेल रे चषक : २०१३-१४

अँसेलोटी मिलानकडे?
रिअल माद्रिद क्लबकडून डच्चू मिळाल्यानंतर कार्लो अँसेलोटी यांच्यासाठी इतर संघांनी कंबर कसली आहे. यामध्ये आघाडीवर एसी मिलान असल्याचे समजते आहे. मिलानचे कार्याध्यक्ष सिल्वीओ बेर्लुस्कोनी म्हणाले, ‘‘प्रशिक्षकपदासाठी अँसेलोटी यांच्या संपर्कात आम्ही आहोत, परंतु या पदासाठी आम्ही चार पर्याय ठेवले आहेत. आशा करतो की अँसेलोटी मिलानकडे परत येतील.’’

माद्रिदच्या प्रशिक्षकपदी बेनिटेझ?
रिअल माद्रिदच्या रिक्त झालेल्या प्रशिक्षकपदाच्या जागेवर नापोली क्लबचे प्रमुख राफा बेनिटेड यांच्या नावाची चर्चा आहे. माद्रिदचे कार्याध्यक्ष पेरेझ यांनी या वृत्तावर बोलण्याचे टाळत ‘‘पुढील आठवडय़ात प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येईल,’’ असे सांगितले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार बेनिटेझ यांचे नाव ९९% निश्चित मानले जात आहे.

वादग्रस्त पेरेझ!
१२ वर्षांच्या कार्याध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत पेरेझ यांनी नऊ प्रशिक्षकांची उचलबांगडी केली आहे. यामध्ये विंसेंट डेल बॉस्क्यू ,कार्लोस क्वीरोझ, जोस अँटोनिओ कॅमॅचो, मारिनो गॅरिआ रेमॉन , व्ॉडंर्लेई लुक्सेंबर्गो , फॅबिओ कॅपेलो , बेंर्ड श्युस्टर, मॅन्युएल पेलेग्रिनी , कार्लो अँसेलोटी अशा दिग्गज प्रशिक्षकांचा समावेश आहे. संघाची कामगिरी अपेक्षेनुरुप न झाल्यास पेरेझ यांचा रोष या हकालपट्टीद्वारे व्यक्त होतो.