बायर्न म्युनिकवर ४-२ अशा विजयासह रिअल माद्रिद उपांत्य फेरीत

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या वादग्रस्त हॅट्ट्रिकच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिकवर ४-२ अशी मात केली. या विजयासह रिअलने उपांत्य फेरीत वाटचाल केली. रोनाल्डोने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत गोलशंभरीही गाठली.

या विजयासह रिअलने स्पर्धेत बायर्न म्युनिकविरुद्धची कामगिरी ६-३ अशी सुधारली. रिअल माद्रिदने सलग सातव्या वर्षी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. रिअलचा संघ पिछाडीवर होता, मात्र रोनाल्डोने भरपाई वेळेत केलेल्या गोलच्या बळावर रिअलने बाजी मारली.

दुसऱ्या नाटय़मय सत्राच्या तुलनेत पहिले सत्र रटाळ ठरले. दोन्ही संघांनी गोलसाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. मध्यंतरानंतर लगेचच बायर्नच्या रॉबर्ट लेव्हानडोव्हस्कीने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले. ७६व्या मिनिटाला रिअलतर्फे रोनाल्डोने प्रत्युत्तर देत बरोबरी केली. पुढच्याच मिनिटाला सर्जिओ रामोसने स्वयंगोल केल्याने रिअलच्या आनंदावर विरजण पडले. बायर्नने २-१ अशी आघाडी घेतली. भरपाई वेळेत रोनाल्डोने दोन गोल करत रिअलला भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र हे दोन्ही गोल ऑफसाइड असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. पंचांनी हे गोल वैध असल्याचा निर्वाळा दिल्याने रोनाल्डोची या स्पर्धेतील गोलशंभरी पूर्ण झाली. हा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. ११२व्या मिनिटाला मार्को असेन्ससिओने गोल करत रिअलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आटय़ुरो व्हिडालला दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आल्याने त्याला मैदान सोडावे लागले. १० खेळाडूंनिशी खेळणाऱ्या बायर्नचे आक्रमण यामुळे कमकुवत झाले.

‘माझ्या गौरवाप्रीत्यर्थ शहरातील रस्त्यांना माझे नाव देण्याची माझी इच्छा नाही. परंतु चाहत्यांनी माझी हुर्यो उडवू नये एवढीच अपेक्षा आहे. प्रत्येकवेळी मैदानावर उतरल्यानंतर सर्वोत्तम खेळ करत संघाच्या विजयात योगदान देण्याचा प्रयत्न करतो. गोल करू शकलो नाही तरी बाकी खेळाडूंना गोलसहाय्य करण्याची भूमिका बजावतो’, अशा शब्दांत रोनाल्डोने आपल्या भावना व्यक्त केल्या.

रिअल माद्रिदचे व्यवस्थापक आणि माजी खेळाडू झिनेदीन झिदान यांनीही रोनाल्डोचे भरभरुन कौतुक केले. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये दडपणाच्या क्षणी रोनाल्डो नेहमीच कामगिरी उंचावतो. यापुढे तरी चाहते हुर्यो उडवणार नाहीत अशी अपेक्षा आहे. पोर्तुगाल तसेच रिअल माद्रिद संघाच्या विजयात रोनाल्डोचे योगदान चाहत्यांनी लक्षात घ्यावे.

अ‍ॅटलेटिको-लिस्टरची बरोबरी

गेल्या वर्षी प्रीमिअर लीग स्पर्धेच्या जेतेपदासह इतिहासात मोहर उमटवणाऱ्या लिस्टर संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध १-१ बरोबरीत समाधान मानावे लागले. सरासरीच्या बळावर अ‍ॅटलेटिकोने बाजी मारली आणि उपांत्य फेरीत स्थान पटकावले.