सातत्याने होणारे बॉम्बस्फोट, तालिबान्यांकडून होणारे हल्ले, हे अफगाणिस्तानमधील रोजचे चित्र. तालिबानी राजवटीने होरपळून निघाल्यानंतर घराबाहेर पडण्याची हिंमत कुणी दाखवत नाही, अशा ठिकाणी काही दिवसांपूर्वी काबूलमधल्या रस्त्यांवर एक दुर्मीळ चित्र पाहायला मिळत होते. अफगाणिस्तानवासीयांनी रस्त्यावर उतरून आनंद साजरा करणे, हे गेल्या कित्येक वर्षांत घडले नसावे, पण काही जण आपल्या गाडय़ांमधून उतरून जल्लोषात सहभागी होत होते. अफगाणिस्तानच्या फुटबॉल संघाने फॉर्मात असलेल्या भारतावर २-० अशी मात करून सॅफ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये जल्लोष सुरू होता. पुढच्या दिवशी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई खेळाडूंच्या आगमनासाठी स्वत: विमानतळावर जातीने हजर होते, पण हातात चषक उंचावलेला अफगाणिस्तान संघाचा कर्णधार झोहिब इस्लाम आमिरी सर्वाचे लक्ष वेधून झोहिब इस्लाम आमिरीघेत होता.
चारकालासारख्या बकाल वस्तीतून देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू मिळाला, म्हणून इस्लाम आमिरीचे सर्वाना अप्रूप वाटत होते. वडिलांचे कपडय़ांचे छोटेसे दुकान.. घरची परिस्थिती तशी बेताचीच.. पण आमिरीमध्ये फुटबॉल खेळण्याची भारी हौस.. म्हणूनच कापडाचा फुटबॉल बनवून त्याने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. हळूहळू फुटबॉल खेळण्याची इच्छा तीव्र होत गेली आणि त्याने आपल्या भागातील मुलांना एकत्र आणले. प्रत्येकाकडून पैसे जमवून खराखुरा फुटबॉल आणला गेला. शिक्षणाचा पत्ता नाही, त्यामुळे रात्रंदिवस फक्त फुटबॉलचा सराव. दिवसभर घराबाहेर असलेल्या मुलांच्या आईवडिलांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळही नसायचा, पण फुटबॉल खेळण्यात व्यग्र असल्यामुळे मुलांच्या संगोपनाची चिंता त्यांना नव्हती, पण गल्लीबोळातील सर्वच घरांच्या काचा या मुलांनी फोडल्या होत्या. त्यामुळे रात्री घरी परतल्यावर बेदम मार त्यांना पडत असे.
तालिबानी राजवटीच्या नियमांनुसार व्यावसायिक फुटबॉल सामन्याच्या मध्यंतरात प्रेक्षकांना खेळण्याची संधी मिळत असे. २००५मध्ये याच योगायोगामुळे एक पाहुणा खेळाडू म्हणून आमिरी मैदानात अवतरला. त्याचे अफलातून कौशल्य पाहून काबूल फुटबॉल क्लबच्या अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या ‘ब’ संघात करारबद्ध करून घेतले. काही महिन्यांनंतर त्याची अफगाणिस्तानच्या संघात निवड झाली. २०१०मध्ये तो अफगाणिस्तान संघाचा कर्णधार बनला, पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अफगाणिस्तान संघाला अनेक स्पर्धामध्ये स्टेडियमजवळील आंघोळीच्या खोलीसमोर काढावे लागले. पाणी विकत घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसत. संघातील खेळाडूंकडे फक्त एकच गणवेश असायचा. सामना झाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू एकमेकांच्या जर्सी बदलत असत, पण बदली करण्यासाठी जर्सीच नसल्यामुळे आमिरीसह त्याचे साथीदार प्रतिस्पर्धी खेळाडूंची माफी मागत असत.
गेल्या दोन वर्षांत अफगाणिस्तान संघाची परिस्थिती थोडी सुधारली आहे. खेळाडूंना प्रवास खर्च म्हणून ५० डॉलर मिळू लागले आहेत. तेही एक महिना उलटल्यानंतर खेळाडूंना मिळतात, पण आमिरीने संघाची बांधणी इतकी मजबूत केली आहे की, २००२मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर परतल्यानंतर त्यांनी क्रमवारीत भारताच्या (१५४) पुढे १३२व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सॅफ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद हा मानाचा चषक आमिरीने अफगाणिस्तानला मिळवून दिला आहे.
काबूल फुटबॉल क्लबकडून खेळताना आमिरीने एका स्थानिक स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. त्यामुळे काबूल संघ काही दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला होता. भारतातील एका स्थानिक फुटबॉल क्लबविरुद्धच्या सामन्यात चमक दाखवल्यामुळे त्याला मुंबई फुटबॉल क्लबने करारबद्ध केले. २०१२मध्ये तो मुंबई संघाचा कर्णधार बनला. त्याच वर्षी त्याला चाहत्यांनी सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडले. सॅफ स्पर्धेतील भारतावरील विजयाने आमिरीवर बक्षिसांचा वर्षांव होत आहे. याच पैशांतून त्याला आता ३ बाय ४ मीटर घराचे मोठय़ा घरात रूपांतर करायचे आहे.