News Flash

रिअल सोसिदादने बार्सिलोनाला रोखले

रिअल माद्रिद ३३ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर बार्सिलोनाच्या खात्यात २७ गुण आहेत.

 

ला लिगा फुटबॉल स्पर्धा

बार्सिलोना क्लबचे सॅन सेबॅस्टियन येथे विजयाची पाटी कोरी राहण्याचे सत्र कायम राहिले. रविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत रिअल सोसिदादने ला लिगा फुटबॉलच्या लढतीत बार्सिलोनाला १-१ असे बरोबरीत रोखले. सॅन सेबॅस्टियन येथे २००७ नंतर बार्सिलोनाला विजयाची चव चाखता आलेली नाही.

पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर ५३व्या मिनिटाला विलियन जोसने हेडरद्वारे गोल करून सोसिदादला १-० अशी आघाडी मिळवून दिली, परंतु ५९व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर सोसिदादने बचावात्मक खेळ करताना बार्सिलोनाला बरोबरीच्या निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले. नशिबाने बार्सिलोनाचा पराभव टळला. सोसिदादच्या कार्लोस व्हेलाचे दोन प्रयत्न गोलजाळीला लागून अपयशी ठरले, तर जुआन्मीने हेडरद्वारे केलेला गोल पंचांनी ऑफ साइड दिल्याने अमान्य करण्यात आला.

‘आम्हाला गुण मिळाला, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. सोसिदादने आमच्यापेक्षा सरस खेळ केला. आक्रमण आणि बचाव या दोन्ही क्षेत्रांत ते उजवे होते,’ असे मत बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी व्यक्त केले. बरोबरीमुळे बार्सिलोनाला दुसऱ्या स्थानी बढती मिळाली असली तरी जेतेपदाच्या शर्यतीत परतण्यासाठी त्यांना पुढील सामन्यात रिअल माद्रिदला नमवावे लागेल. रिअल माद्रिद ३३ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर बार्सिलोनाच्या खात्यात २७ गुण आहेत.

तत्पूर्वी, अ‍ॅटलेटिको माद्रिद विजयपथावर परतला आणि गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले. डिएगो गॉडीन, केव्हिन गॅमेइरो आणि यानिक कॅरास्को यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर अ‍ॅटलेटिकोने ३-० अशा फरकाने ओसासूनावर मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 12:07 am

Web Title: real sociedad blocked barcelona
Next Stories
1 पंकज अडवाणी उपांत्य फेरीत
2 युवा फुटबॉलपटूंची प्रगती समाधानकारक
3 धोनीमुळेच कोहलीची कसोटी कारकिर्द बहरली: सेहवाग
Just Now!
X