भारताविरुद्धची मालिका आगामी क्रिकेट मालिका विश्वचषक २०१५च्या दृष्टीकोनातून दक्षिण आफ्रिकेसाठी महत्वाची ठरले आणि भारताला कडवे आव्हान देणे ही आफ्रिकेची खरी परीक्षा असेल असे दक्षिण आफ्रिका संघाचे माजी कर्णधार केल्पर व्हेसल्स यांनी म्हटले आहे.
नुकत्याच पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने केलेल्या उत्तम कामगिरीवर खूष असल्याचेही केल्पर म्हणाले.
पाकिस्तान विरुद्धची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपली तर, पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकाने ४-१ अशा आघाडीने पाकिस्तानला धूळ चारली.
पाकिस्तान विरुद्ध जरी संघाने चांगली कामगिरी केली असली तरी भारतीय संघाविरुद्धच्या दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मी उत्सुक असल्याचे केल्पर म्हणाले.
दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध नक्की चांगल्या धावा करेल यात शंका नाही कारण, भारतीय संघात सध्या गोलंदाजी हवी तशी प्रबळ नाही. परंतु, भारतीय फलंदाजी मुख्यत्वे युवा फलंदाज अतिशय भक्कम खेळी करणारे आहेत. त्यामुळे ही मालिका अतिशय चुरशीची होईल.