इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. लॉर्डसवरील भारतीय संघाचा विजय जरी ऐतिहासिक असला तरी तिसऱया कसोटीत तब्बल २६६ धावांनी झालेला पराभव भारतीय संघाचे डोळे उघडणारा आहे. त्यामुळे भारताच्या या पराभवाला लॉर्डसवरील विजयाच्या सावलीत आश्रय देणे योग्य ठरणार नाही. भारताच्या या पराभवाची पाच कारणे…

१. लॉर्डसवरील पराभवानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या नेतृत्वावर टीकेचा भडीमार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱया कसोटीत ‘टीम कुक’कडून जबाबदारीने फलंदाजी होणार याची कल्पना भारतीय गोलंदाजांना नसणे हे रास्तच. तरीसुद्धा भारतीय गोलंदाजांकडून याची काळजी बाळगली गेली नाही आणि अत्यंत सुमार गोलंदाजीचा पहिला फटका भारताला बसला. इंग्लंडने पहिल्या डावात ५६९ धावांचा डोंगर रचला.

२. इंग्लंडसारख्या महत्त्वपूर्ण दौऱयासाठी संधी मिळालेला भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज पंकज सिंहचा मारा सपशेल फोल ठरला. पंकज सिंहला तिसऱया कसोटीत एकही विकेट मिळवता आली नाही. मोहम्मद शमीची कामगिरीही सुमार राहिली.

३. इंग्लंडच्या ५६९ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजीही ‘फ्लॉप शो’ ठरताना दिसली. सलमीवीर शिखर धवन तर, ट्वेन्टी-२० च्या मुशीत खेळल्यासारखा बेजबाबदार फटके मारताना दिसला. कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या फलंदाजीची बाजू भक्कम राखण्यासाठी संघात समाविष्ट असलेल्या चेतेश्वर पुजारानेही अपेक्षा भंग केला तर, युवा फलंदाज विराट कोहलीनेही इंग्लंड गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.

४. ज्या मैदानात इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी दीड-शतके ठोकली (१५०हून अधिक धावा) त्याच मैदानात भारतीय संघातील एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही. शतक तर सोडाच पण, अजिंक्य राहाणे आणि कर्णधार धोनी वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला अर्धशतकही गाठता आले नाही.

५. फॉलोऑन न देता इंग्लंड संघाने भक्कम आघाडीचा फायदा घेत भारतासमोर विजयासाठी ४४५ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य समोर ठेवले असतानाही चोरटी धाव घेण्यात आणि मोठे फटके मारण्यात भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट्सचे आंदण दिले त्यामुळेच दुसऱ्या डावात भारतीय संघ १७८ धावांतच कोसळला.