प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी हकालपट्टी केल्याचा राग डोक्यात घालून घेत त्याने निवृत्तीचा निर्णय घेण्याचा विचार केला खरा, पण पुत्ररत्न झाल्यावर मात्र त्याचे मन बदलले आणि त्याचे हे बंड आता थंड झाले आहे. आता भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीप्रमाणेच अ‍ॅशेस मालिकेतही खेळण्याचे ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार शेन वॉटसन याने ठरवले आहे.
ऑस्ट्रेलियामधील ‘न्यूज लिमिटेड’ या प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, वॉटसनला अ‍ॅशेस मालिकेपूर्वी कसोटी सामने खेळायचे नाही, कारण या घडीला त्याला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. पण भारतातील दिल्ली येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीला जाण्याचा विचार करत आहे.
वॉटसनच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, वॉटसनला त्याची पत्नी ली आणि मुलगा विल यांच्याबरोबर राहायचे आहे. तीन-चार दिवस तरी त्याला या दोघांबरोबर राहायचे असून दिल्ली येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी तो जाऊ शकेल.
हकालपट्टीनंतर सिडनीमध्ये पोहोचल्यावर ‘‘मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे’’, अशी प्रतिक्रिया वॉटसनने दिली होती. त्या वेळीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे उच्च कामगिरी निरीक्षक प्रमुख पॅट होवार्ड यांनी ‘वॉटसन हा कधीतरी खेळणारा खेळाडू’ असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वेळी वॉटसनने निवृत्तीचा विचार केला असला तरी आता मात्र त्याने भारताविरुद्धचा चौथा कसोटी सामना खेळण्याचे ठरवले आहे.

वचनबद्ध वॉटसनबद्दल प्रश्नच नाही- पॉन्टिंग
मेलबर्न : ‘‘शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारत ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने उपकर्णधार शेन वॉटसन याची हकालपट्टी केली असली, तरी त्याची पाठराखण माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने केली आहे. वॉटसन हा संघासाठी वचनबद्ध आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीबद्दल प्रश्नच नाही,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.
पॉन्टिंग पुढे म्हणाला की, ‘‘वॉटसनएवढा अथक मेहनत घेणारा क्रिकेटपटू मी पाहिला नाही, त्याच्या वचनबद्धतेबद्दल प्रश्नच नाही. शाळकरी मुलांसारखा त्याला अभ्यास करायला लावणे मला आवडले नसते. वॉटसन एक उत्तम अष्टपैलू खेळाडू असून चांगला माणूस आहे. त्याच्याबरोबर खेळताना मी अनेक क्षणांचा आनंद लुटला आहे.’’