फ्रँक लॅम्पर्डच्या दुहेरी धमाक्यामुळे चेल्सीने इंग्लिश प्रीमिअर लीगमधील अखेरच्या सामन्यात पिछाडीवरून मुसंडी मारत अ‍ॅस्टन व्हिलाचा २-१ असा पराभव केला. या कामगिरीमुळे लॅम्पर्डने चेल्सीतर्फे सर्वाधिक २०३ गोल करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
ख्रिस्तियान बेन्टेके याने केलेल्या गोलमुळे अ‍ॅस्टन व्हिलाने १४व्या मिनिटालाच आघाडी घेतली होती. परंतु ६१व्या मिनिटाला लॅम्पर्डने सुरेख गोल करून चेल्सीच्या बॉबी टॅम्बलिंग यांचा बऱ्याच वर्षांपासून अबाधित असलेला सर्वाधिक गोल्सचा विक्रम मागे टाकला. ८८व्या मिनिटाला त्याने केलेल्या गोलमुळे चेल्सीने विजय मिळवला. चेल्सीतर्फे २०३ गोल करण्याची करामत त्याने साधली. या विजयासह चेल्सीने ७२ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. दुखापतीमुळे जॉन टेरीचे युरोपा लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.