19 November 2017

News Flash

विक्रमी अरमान!

अरमान जाफरने आपले काका वसिम जाफर यांच्या पावलांवर पावले ठेवत फलंदाजीच्या अद्वितीय यशाने

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 15, 2013 4:49 AM

हॅरिस शिल्डमध्ये अरमान जाफरनने मोडला सर्फराझ खानचा विक्रम
४७३-चौकार-६५/षटकार- १५
अरमान जाफरने आपले काका वसिम जाफर यांच्या पावलांवर पावले ठेवत  फलंदाजीच्या अद्वितीय यशाने क्रिकेटजगताचे लक्ष वेधले आहे. गुरुवारी माटुंगा जिमखाना मैदानावर अरमानने ३५९ चेंडूंत ४७३ धावांची विक्रमी खेळी साकारून हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कमाल केली. ही खेळी साकारताना अरमानने हॅरिसमधील सर्वाधिक ४३९ धावांचा सर्फराझ खानचा दोन वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. अरमानने आपल्या दिमाखदार खेळीत ६५ चौकार आणि १५ षटकार ठोकत प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षकांना सळो की पळो करून सोडले.
अरमान याने सिद्धरत सिंग याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ३८३ मिनिटांत आणि ६६७ चेंडूंत ६३१ धावांची भली मोठी भागीदारी रचण्याची किमया साधली. सिद्धार्थ सिंगने १७७ धावा केल्या. दुर्दैवाने अरमान जाफर आणि सिद्धार्थ सिंग जोडीला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पध्रेतील ६६४ धावांचा विक्रम मोडण्यात अपयश आले.
त्यामुळेच आयईएस व्ही. एन. सुळे गुरुजी हायस्कूल इंग्रजी माध्यम शाळेच्या पहिल्या डावातील ३५३ धावसंख्येला आता वांद्रे येथील रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूलने ५ बाद ८२३ असे जबरदस्त प्रत्युत्तर देत जेतेपदावरील आपला दावा मजबूत केला आहे. प्रतिस्पर्धी संघाकडून हेरम परबने टिच्चून गोलंदाजी करीत १७३ धावांत ३ बळी घेतले.
शालेय क्रिकेटमध्ये धावांचे इमले बांधणाऱ्या अरमान याने २०१०मध्ये गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पध्रेत वयाच्या तेराव्या वर्षी ४९८ धावांची खेळी साकारली होती. त्यावेळी शालेय क्रिकेटमध्ये पाचशे धावांचा टप्पा ओलांडण्याची त्याची संधी हुकली होती. यावेळी अरमान याने पुन्हा साडेचारशेचा टप्पा ओलंडला. विजय र्मचट १६ वर्षांखालील क्रिकेट स्पध्रेत अरमानच्या नावावर या हंगामात १०६२ धावा जमा आहेत.
संक्षिप्त धावफलक
व्ही. एन. सुळे गुरुजी हायस्कूल (पहिला डाव) : ३५३
रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूल (पहिला डाव) : ५ बाद ८२३ (पृथ्वी शॉ ८१, सिद्धार्थ सिंग १७७, अरमान जाफर ४७३; हेरम परब ३/१७३)

पाचशे धावांचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरल्यामुळे मी निराश झालो आहे. मी ही खेळी साकारताना अखेरीस थकलो आणि चुकीचा फटका खेळून बाद झालो.
अरमान जाफर

First Published on February 15, 2013 4:49 am

Web Title: record breaking arman