01 March 2021

News Flash

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : बायर्न म्युनिककडून नव्या विक्रमाची नोंद

गतविजेत्या बायर्न म्युनिकने सीएसकेए मॉस्को संघावर ३-१ असा विजय मिळवून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सलग १० सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला.

| November 29, 2013 01:33 am

गतविजेत्या बायर्न म्युनिकने सीएसकेए मॉस्को संघावर ३-१ असा विजय मिळवून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सलग १० सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला. मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि पॅरिस सेंट जर्मेन या बलाढय़ संघांनी चॅम्पियन्स लीगच्या अव्वल १६ संघांमध्ये मजल मारली आहे.
चेल्सी, बायर्न म्युनिक, अ‍ॅटलेटिको माद्रिद, बार्सिलोना आणि मँचेस्टर सिटी यांनी याआधीच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवल्यामुळे अव्वल आठ संघांमध्ये झेप घेण्याकरिता या बलाढय़ संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. बायर्न म्युनिकने बार्सिलोनाने २००२मध्ये रचलेला विक्रम मोडीत काढला. आर्येन रॉबेन, मारिओ गोएट्झे आणि थॉमस म्युलर यांनी प्रत्येकी एक गोल करत बायर्न म्युनिकच्या विजयात मोलाचा हातभार लावला. सीएसकेए मॉस्को संघाकडून कैसुके होन्डा याने एकमेव गोल केला.
इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये गेल्या काही सामन्यांत चांगली कामगिरी न करता आलेल्या मँचेस्टर युनायटेडने या स्पर्धेत लेव्हरकुसेन संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. मँचेस्टर युनायटेडच्या विजयात अँटोनियो व्हॅलेन्सिया, जॉनी इव्हान्स, ख्रिस स्मॉलिंग, नानी आणि इमिर स्पाहिक (स्वयंगोल) यांनी गोल करून महत्त्वाची भूमिका बजावली. ‘‘आमची ही या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे. बाहेरच्या मैदानांवर येऊन पाच गोल झळकावणे, ही आमच्यासाठी विशेष बाब आहे,’’ असे मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक डेव्हिड मोयेस यांनी सांगितले.
रिअल माद्रिदने गालाटासारे संघाचा ४-१ असा धुव्वा उडवला. गॅरेथ बॅलेने फ्री-किकवर केलेला अप्रतिम गोल आणि त्यानंतर अल्वारो आर्बेलोआ, अँजेल डी मारिया आणि इस्को यांनी गोल लगावले. स्वीडनचा झ्लटान इब्राहिमोव्हिच याने पॅरिस सेंट जर्मेनसाठी पहिला गोल करत चॅम्पियन्स लीगमधील १००व्या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्यानंतर इडिन्सन कावानी याच्या गोलमुळे पॅरिस सेंट जर्मेनने ऑलिम्पियाकोस संघावर २-१ अशी मात करत आगेकूच केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:33 am

Web Title: record breaking bayern munich beat cska to keep up perfect record
Next Stories
1 महाराष्ट्राने आंध्रला रोखले
2 विजय झोलकडे भारताचे नेतृत्व
3 फुटबॉलमध्येही फिक्सिंगची वाळवी : कथित आरोपांप्रकरणी तीन खेळाडू अटकेत
Just Now!
X