ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची तयारी करण्यासाठी इंडोनेशियाच्या फ्लँटी लिम्पेले यांच्या जागी दुहेरीच्या नव्या विशेषज्ञ प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी यांनी केली आहे.

लिम्पेले यांचा कार्यकाळ टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत होता. परंतु करोनामुळे ऑलिम्पिक लांबणीवर पडले आहे, तर लिम्पेले यांनी कौटुंबिक कारणास्तव गेल्या महिन्यात राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देणारे ते चौथे परदेशी प्रशिक्षक ठरले आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकच्या विशेष तयारीसाठीच लिम्पेले यांची नियुक्ती करण्यात आली होती. ऑलिम्पिक लांबणीवर पडल्यामुळे तयारीसाठी आणखी वेळ मिळणार आहे, असे चिरागने सांगितले. ‘‘आता आम्हाला तयारीसाठी वर्षभराहून अधिक काळ मिळणार आहे. त्यामुळे भारतीय बॅडमिंटन संघटनेने नव्या प्रशिक्षकाची तातडीने नेमणूक करावी,’’ असे आवाहन चिरागने के ले.

लिम्पेले यांचा राजीनामा धक्कादायक असल्याचे सात्त्विकने नमूद के ले. ‘‘ऑलिम्पिक होण्याआधीच लिम्पेले यांनी पदभार सोडणे आमच्यासाठी चिंताजनक आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन प्रत्येक सामन्यानंतर आम्हाला उपयुक्त ठरायचे. त्यामुळे त्यांच्यावर आमचा दृढ विश्वास होता. आता पुढील तयारी कशी करायची, हेच समजत नाही,’’ असे सात्त्विकने सांगितले.

करोनाची टाळेबंदी उठल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आल्यावर लवकरच नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. यासंदर्भात माझे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याशी चर्चा झाली आहे, असे आश्वासन भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले.

राष्ट्रकु ल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या चिराग आणि सात्त्विक जोडीने गतवर्षी थायलंडमध्ये सुपर ५०० दर्जाची स्पर्धा प्रथमच जिंकण्याची किमया साधली होती.  याचप्रमाणे सुपर ७५० दर्जाच्या स्पर्धेत अंतिम फे रीत धडक मारली होती. अनुभवी प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळाल्यास ऑलिम्पिकमध्ये आम्हाला अधिक चांगली कामगिरी बजावता येईल, असे चिरागने सांगितले.