ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिलांना अखेरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने १५ धावांनी विजय मिळवत शुभ्र धुलाई होण्यापासून संघाला वाचवले.
१३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय महिलांनी १३.३ षटकांत ३ बाद ९४ अशी मजल मारली होती, परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १२१ धावांवर समाधान मानावे लागले. अखेरच्या ६.३ षटकांत भारतीय महिलांनी पाच बळी गमावून अवघ्या २७ धावा केल्या.
सलामीची फलंदाज वेल्लास्वामी वनिताने सर्वाधिक २८ धावा केल्या. हरमनप्रीत कौर (२४) आणि वेदा कृष्णमूर्ती (२१) यांनी संघर्ष केला. कर्णधार मिताली राजलाही (१२) खेळपट्टीवर फार काळ तग धरता आला नाही. इलायसे पेरीने सर्वाधिक ४ बळी टिपले. तत्पूर्वी, पेरीच्या नाबाद ५५ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १३६ धावांपर्यंत मजल मारली.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५ बाद १३६ (बेथ मुनी ३४, मेग लॅनिंग २६, इलायसे पेरी नाबाद ५५; राजेश्वरी गायकवाड २-३६) विजयी वि. भारत : ८ बाद १२१ (वेल्लास्वामी वनिता २८, हरमनप्रीत कौर २४, वेदा कृष्णमूर्ती २१; इलायसे पेरी ४-१२, रेने फेरेल २-१८); सामनावीर : इलायसे पेरी; मालिकावीर : झूलन गोस्वामी.