देश विरुद्ध क्लब हा वाद आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून गाजत आहे. क्लबतर्फे खेळताना अमाप पैसे करारापोटी घेणारे अव्वल खेळाडू जीव ओतून आपल्या क्लबला यशाच्या शिखरावर नेण्याचा प्रयत्न करतात. पण देशाला त्यांच्या चांगल्या कामगिरीची गरज असते, तेव्हा हेच खेळाडू अपयशी ठरतात किंवा दुखापतीचे कारण सांगून माघार घेतात. त्यामुळेच लिओनेल मेस्सीसारखे अनेक दिग्गज फुटबॉलपटू टीकेचे धनी होतात. २०१३चा मोसम हा फुटबॉलपटूंच्या कसोटीचा काळ होता. आपल्या देशाला पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवून देण्याबरोबरच क्लबचा विश्वास सार्थकी लावावा, अशा दुहेरी आघाडय़ांवर प्रत्येक जण लढत होता. हे वर्ष म्हणजे २०१४च्या फुटबॉलमधील महाकुंभमेळ्याची रंगीत तालीम होती.
फिफा विश्वचषकाचे बिगूल वाजले
फुटबॉलमधील ज्या महासोहळ्याची सर्वाना प्रतीक्षा असते, तो सोहळा आता जवळ येत चालला आहे. सरत्या वर्षांत तब्बल २०७ संघ फिफा विश्वचषकाच्या ३१ संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी एकमेकांशी झुंजत होते. यजमान ब्राझील आणि फुटबॉलमधील सुवर्णकाळ अनुभवणारा स्पेनचा संघ जेतेपदासाठी दावेदार समजले जात असले, तरी अनेक बलाढय़ संघांचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. नेदरलॅण्ड्स, इटली, अमेरिका, अर्जेटिना, जर्मनी, रशिया, इंग्लंड, स्पेन यांसारख्या अव्वल संघांनी पात्रता फेरीवर वर्चस्व गाजवत फिफा विश्वचषकातील स्थान निश्चित केले. मात्र २०१०च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा उरुग्वे, फ्रान्स आणि ग्रीससारख्या संघांना प्ले-ऑफ फेरीद्वारे स्थान मिळवण्यासाठी झुंजावे लागले. आता सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे ती जून महिन्यात सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषकाची.
ईपीएलमध्ये जेतेपदासाठी चुरस
मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांची निवृत्ती हा युरोपियन फुटबॉलला बसलेला सर्वात मोठा धक्का होता. फग्र्युसन यांनी आपल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत मँचेस्टर युनायटेडला १३ वेळा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद मिळवून दिले. फग्र्युसन यांच्या निवृत्तीनंतर मँचेस्टर युनायटेडचे नशीबही रुसले. एरव्ही संपूर्ण मोसमावर दादागिरी करणारा हा संघ आता विजय मिळवण्यासाठीही धडपडत आहे. त्याउलट अर्सेनल, लिव्हरपूल, चेल्सी, मँचेस्टर सिटी आणि एव्हरटन तसेच न्यू कॅसल या संघांनी पहिल्या टप्प्यात चमकदार कामगिरी केल्यामुळे ईपीएल जेतेपदासाठीची शर्यत अधिक तीव्र होत चालली आहे.
स्पॅनिश लीगवर बार्सिलोनाचे वर्चस्व
युरोपियन फुटबॉलमधील एकेकाळची सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा असा नावलौकिक मिळवणाऱ्या स्पॅनिश लीगमध्ये बार्सिलोना, रिअल माद्रिद आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद या संघांची दादागिरी पाहायला मिळते. स्पॅनिश लीग म्हणजे लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची अफलातून कामगिरी. या मोसमातही लिओनेल मेस्सी आणि नेयमारच्या सुरेख कामगिरीमुळे बार्सिलोनाने अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र रोनाल्डो अनेक वेळा तारणहार ठरला तरी रिअल माद्रिद संघ गुणतालिकेत बराच मागे पडला होता. रिअल माद्रिदने बार्सिलोनाला गाठण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. दुखापतीमुळे मेस्सी आणि रोनाल्डो सध्या मैदानाबाहेर असले तरी त्यांच्या अनुपस्थितीचा संघाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
गॅरेथ बॅलेचे ‘बल्ले बल्ले’
लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दिग्गज फुटबॉलपटूंच्या मांदियाळीत एका नव्या ताऱ्याची भर पडली तो म्हणजे गॅरेथ बॅले. फुटबॉलपटूंना मिळणाऱ्या मानधनाबाबत नेहमीच चर्चा होत असते. पण रिअल माद्रिदने टॉटनहॅम हॉट्सपरकडून विकत घेतलेल्या गॅरेथ बॅलेच्या मानधनाचा आकडा सर्वाचेच डोळे दिपवणारा होता. १२३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके घसघशीत मानधन घेणाऱ्या बॅलेने रोनाल्डो आणि मेस्सी या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंनाही मागे टाकले.
भारतीय फुटबॉलचे ‘धीरे चलो’
भारतीय संघ फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकेल का, हे कोडेच आहे. फिफा क्रमवारीत १४८व्या स्थानावर असलेल्या भारताच्या वाटय़ाला २०१३ मोसमात फारच कमी सामने आले. भारताला १२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत फक्त पाच सामने जिंकता आले, तर पाच सामन्यांत पराभव आणि दोन सामने बरोबरीत सोडवता आले. सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदासाठी दावेदार समजल्या जाणाऱ्या भारताने अंतिम फेरीत पत्करलेली शरणागती ही भारतीय फुटबॉलची प्रगती धीम्या गतीने सुरू असल्याची प्रचिती देत होती. या सामन्यात भारताला अफगाणिस्तानकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. पण भारतीय फुटबॉलला नवसंजीवनी देणारी गोष्ट काही दिवसांपूर्वी घडली. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने भारताला २०१७साली होणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाच्या संयोजनपदाचे हक्क दिले आहेत, हीच भारताच्या दृष्टीने या वर्षांतील समाधानाची बाब म्हणता येईल.
भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने माजी कर्णधार बायच्युंग भूतियाचा सर्वाधिक ४२ गोलांचा विक्रम मागे टाकला. त्याचबरोबर अनेक प्रतिष्ठित क्लब्सचा भारतात झालेला प्रवेश, आयपीएलच्या धर्तीवर होणारी आयएमजी-रिलायन्स सुपर लीग स्पर्धा, यावरून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे भारतीय फुटबॉलला झळाळी मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.