ऑलिम्पिकसाठी भारतीय नौकानयन महासंघाने बंदी उठवली

२०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पराभवाचे कारण देत नौकानयनपटू दत्तू भोकनळवर घालण्यात आलेली दोन वर्षांची बंदी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या मध्यस्थीमुळे गुरुवारी उठवण्यात आली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक स्कल्स प्रकारात दत्तूने सुवर्णपदक जिंकून दिले, परंतु त्याने वैयक्तिक स्कल्स  शर्यत अध्र्यावर सोडली. त्यामुळे गतवर्षी मार्च महिन्यात भारतीय नौकानयन महासंघाने त्याच्यावर दोन वष्रे बंदीची कारवाई केली होती. शर्यतीच्या दिवशी मी आजारी होतो आणि मी बोटवरून घसरलो, असे कारण दत्तूने यासंदर्भात दिले होते. परंतु बत्रा यांनी भारतीय नौकानयन महासंघाला शिक्षेचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले होते.

‘‘दत्तूवरील दोन वर्षांची बंदी २३ जानेवारी २०२० पासून उठवण्यात आली आहे. चांगजू (कोरिया) येथे २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी तयारी करण्याचे निर्देश त्याला देण्यात आले आहे,’’ असे भारतीय नौकानयन महासंघाच्या अध्यक्ष राजलक्ष्मी सिंह देव यांनी सांगितले.

बत्रा यांनी नौकानयन महासंघाला दत्तू प्रकरणातील सर्व कागदपत्रे शुक्रवारी सादर करण्यास सांगितले होते. हे प्रकरण भारतीय ऑलिम्पिक संघटनेची शिस्तपालन समितीकडे वर्गीकृत करण्यात येणार असल्याचे बत्रा म्हणाले होते. परंतु हे प्रकरण नौकानयन महासंघाच्या खेळाडूंच्या आयोगाकडे आहे, असे राजलक्ष्मी यांनी त्यांना सांगितले. गेल्या महिन्यात दत्तू भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या खेळाडूंच्या आयोगाकडे गेला होता. त्यानंतर माजी लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्जने हे प्रकरण गांभीर्यपूर्वक हाताळले. तिने ऑलिम्पिक संघटनेला पत्र पाठवून टोक्यो ऑलिम्पिकच्या दृष्टीने दत्तूवरील बंदी कमी करण्यात यावी, अशी विनंती केली.