करोनामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या चॅपेल-हॅडली एकदिवसीय मालिकेसाठी उर्वरित दोन सामने रद्द करण्यात आले आहेत. करोनामुळे परदेश प्रवासाचे नवे निर्बंध लागू होण्याआधी पाहुण्या संघाला मायदेशी परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यूझीलंड सरकारने रविवारी मध्यरात्रीपासून परदेश प्रवासाचे निर्बंध लागू केले. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघटनेने न्यूझीलंड संघाला त्वरित मायदेशी परतण्याचा सल्ला दिला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळ भविष्यात द्विराष्ट्रीय मालिकेची योजना आखतील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले आहे.

या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर प्रेक्षकांविना झाला. सावधगिरीची उपाययोजना म्हणून वेगवान गोलंदाज लॉकी फग्र्युसनच्या ‘कोव्हिड-१९’च्या चाचण्या घेण्यात आल्या असून, अहवालानुसार त्यात कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.

इंग्लंडची श्रीलंकेतील मालिका आणि दक्षिण आफ्रिकेची भारतामधील मालिका स्थगित करण्यात आल्यानंतर चॅपेल-हॅडली चषक ही करोनामुळे स्थगित करण्यात आलेली अखेरची क्रिकेट मालिका आहे.