महेंद्रसिंग धोनी याच्या कचखाऊ नेतृत्वामुळेच भारतीय क्रिकेट संघास परदेश दौऱ्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. त्याच्याऐवजी विराट कोहलीकडे कर्णधारपद द्यावे, असे ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ कसोटीपटू इयान चॅपेल यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीवरील स्तंभात चॅपेल यांनी धोनीवर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, धोनी हा कधीकाळी ट्वेन्टी-२० व एक दिवसीय सामन्यांमधील अव्वल दर्जाचा कर्णधार मानला जात होता, मात्र आता धोनीची अवस्था विसरभोळ्या प्राध्यापकासारखी झाली आहे. त्याच्या बचावात्मक धोरणांमुळेच न्यूझीलंडमधील एक दिवसीय सामने तसेच कसोटी सामन्यात भारतास पराभव स्वीकारावा लागला. त्याच्या चुकीच्या धोरणांचा प्रतिस्पर्धी फलंदाजांना फायदा होत आहे. गोलंदाजीतील बदल व रणनीतीबाबत तो खूपच चुकीचे तंत्र उपयोगात आणत आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना मोठय़ा भागीदारी करणे सहज शक्य होत आहे.