येत्या आठवडाभराच्या कालावधीत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची पुन्हा एकदा यो-यो टेस्ट घेतली जाण्याची शक्यता आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान कसोटी आणि इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे. १५ जून रोजी ही टेस्ट घेतली जाणार असून यामध्ये प्रामुख्याने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.

रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्र स्विकारल्यानंतर सर्व खेळाडूंना यो-यो टेस्ट अनिवार्य करण्यात आली. युवराज सिंह आणि सुरेश रैना यांना काही वर्षांपूर्वी यो-यो टेस्ट पास करण्यात अपयश आल्यामुळे त्यांना भारतीय संघात जागा दिली गेली नव्हती. बीसीसीआयच्या या कार्यपद्धतीवर काही माजी खेळाडूंनी टीकाही केली. मात्र क्रिकेटचं बदलत स्वरुप पाहता, खेळाडूंची शाररिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी ही यो-यो टेस्ट गरजेचं असल्याचं प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं.

१४ जून पासून भारतीय संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात, अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. अफगाणिस्ताने नुकत्याच बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत निर्भेळ यश संपादन केलं आहे. या सामन्यांमध्ये अफगाणिस्तानी खेळाडूंनी क्षेत्ररक्षणादरम्यान दाखवलेली चपळाई, आक्रमक फलंदाजीच, भेदक गोलंदाजी पाहता भारतीय खेळाडूंना हा सामना सोपा जाणार नाही. त्यामुळे कोणते खेळाडू यो-यो टेस्ट पास करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.