मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारत अ संघाचा खेळाडू संजू सॅमसन यो-यो फिटनेस टेस्ट नापास झाल्यामुळे संघातून बाहेर पडला आहे. संजूची इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघाकडून निवड झाली होती. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ इंग्लंडला रवाना झाला असून, संजू सॅमसन संघासोबत गेला नसल्याची माहिती समोर येते आहे.

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी यो-यो फिटनेस टेस्ट अनिवार्य केली आहे. इंग्लंड दौऱ्यात टी-२० आणि वन-डे सामन्यांसाठी संजू सॅमसनची संघात निवड झाली होती. मात्र यो-यो टेस्टमध्ये संजूने १६.१ गुण नोंदवले, त्याची ही कामगिरी इंग्लंड दौऱ्यासाठी पुरेशी नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलेलं आहे.

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आश्वासक कामगिरी केली होती. हंगामाअखेरीस संजूच्या खात्यात ४४१ धावा जमा होत्या, यामध्ये ३ अर्धशतकी खेळींचाही समावेश होता. मात्र चमकदार कामगिरी करुनही यो-यो फिटनेस टेस्ट पास न झाल्यामुळे संजूची संधी हुकली आहे.