इंग्लंड दौऱ्यामध्ये वन-डे मालिकेपाठोपाठ भारताला कसोटी मालिकेतही पराभवाचा सामना करावा लागला. ५ सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या मानहानीकारक पराभवावर अनेकांनी परखड शब्दांत भाष्य केलं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, संघातील खेळाडू विराट कोहली-रवी शास्त्री यांच्यावर नाराज असल्याचं समजतंय. कसोटी मालिकेत वारंवार संघात केल्या गेलेल्या बदलांमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याचं मत एका खेळाडूने इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी बोलताना दिलं आहे. नुकताच हा खेळा़डू इंग्लंडच्या दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे.

अवश्य वाचा – Ind vs Eng : चौथ्या कसोटीतला पराभव आश्विनमुळे – हरभजन सिंह

“मालिका सुरु होण्याच्या आधी जर आम्हाला सांगण्यात आलं असलं की, संघात बदल होणार नाहीत; तुम्ही खेळ सुधारा तर खेळाडूंना एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला असता. कोहली हा उत्कृष्ट खेळाडू आहे, तो आपल्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र संघात वारंवार बदल केले तर खेळाडू म्हणून तुम्ही स्वतःवर संशय घेता. कर्णधार असा का वागला असेल? यासारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात यायला सुरुवात होते.” खेळाडूने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – Ind vs Eng : पृथ्वी शॉचं कसोटी पदार्पण लांबणार? 

तिसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर विराटने अखेरीस चौथ्या कसोटीत संघात कोणतेही बदल केले नाहीत. तब्बल ३८ कसोटी सामन्यांनंतर विराटने आपला संघ कायम राखला. चेतेश्वर पुजारा सारख्या कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचीही संघातली जागा पक्की नव्हती. मालिकेदरम्यान फलंदाजांनी केलेल्याकामगिरीवर चांगलीच टीका झाली. मात्र गोलंदाजांची कामगिरीही फारशी चांगली नव्हती. इंग्लंडच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांसाठी भारतीय गोलंदाजांनी कोणत्याही प्रकारची रणनिती आखलेली नव्हती. पहिल्या ४ फलंदाजांना माघारी धाडल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उर्वरित फलंदाजांना गृहीत धरलं, आणि प्रत्येक सामन्यात मधल्या आणि तळातल्या फळीतील फलंदाजांनी भारताला धक्का दिल्याचं खेळाडू म्हणाला. दोन संघांमधला शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या कसोटीत कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.