श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने 2019 साली होणाऱ्या आयपीएल लिलावासाठी आपलं नाव यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम पाहण्याची शक्यता आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

याआधी झहीर खानने 3 वर्ष मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यानंतर झहीर दिल्ली संघाकडून आयपीएल खेळला. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लसिथ मलिंगाने आगामी आयपीएल हंगामात खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर, झहीर खानला गोलंदाज मार्गदर्शक म्हणून काम करण्याबद्दल विचारण्यात आलं होतं, आणि झहीर खाननेही याला होकार कळवल्याचं समजतंय.

मलिंगाने नुकतचं श्रीलंकेच्या संघात पुनरागमन केलं आहे. 2019 साली होणारं आयपीएल हे दक्षिण आफ्रिकेत खेळवलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने तयारीसाठी मलिंगाने आपलं नाव लिलावाच्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे.