News Flash

राखीव खेळाडूंनाही सामन्यांचा सराव अत्यावश्यक -श्रीधर

सर्व खेळाडू बहरात असल्याबद्दल खूप आनंद असून विशेषत्वे गोलंदाजही पूर्ण लयीत गोलंदाजी करीत असल्याचे श्रीधर यांनी सांगितले.

आर. श्रीधर

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने भारताच्या संभाव्य संघातील राखीव खेळाडूंनाही सामन्यांचा सराव मिळणे आवश्यक आहे. कोणताही खेळाडू हा विश्वचषकात सामन्यांचा पुरेसा सराव गाठीशी नसतानाच मैदानावर खेळायला उतरला असे होऊ नये, याबाबत दक्षता घेतली जायला हवी, असे मत भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी व्यक्त केले.

सर्व खेळाडू बहरात असल्याबद्दल खूप आनंद असून विशेषत्वे गोलंदाजही पूर्ण लयीत गोलंदाजी करीत असल्याचे श्रीधर यांनी सांगितले. ‘‘सातत्याने जिंकणे ही एक सवय असते. ती सवय कायम राखत घोडदौड करणे आवश्यक आहे. विश्वचषकापूर्वी आता भारतीय संघ केवळ सात सामने खेळणार असल्याने ही सवय तर अधिकच पक्की करण्याची गरज आहे. जे अकरा खेळाडू नियमितपणे खेळतात, ते वगळता उर्वरित राखीव खेळाडूंमध्ये एक प्रकारचा सुस्तपणा येतो. मात्र, एखाद्या वेळी अचानकपणे जर कुणा राखीव खेळाडूला सामन्यात उतरावे लागले, तर त्याची तशी मानसिकता नसल्याने खेळावर परिणाम होतो. असे घडू नये, यासाठी सर्व राखीव खेळाडूंनादेखील विश्वचषकापूर्वी संधी देऊन त्यांना सामन्यांसाठी सज्ज ठेवले जावे,’’ असेही त्यांनी सांगितले.

‘‘जूनमध्ये इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषकासारखेच वातावरण न्यूझीलंडमध्ये असल्याने तशाच परिस्थितीत सराव करायला मिळण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. त्यामुळे भारताच्या अशा सर्व संभाव्य युवा खेळाडूंना संधी मिळण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघ फलंदाजीत नेहमीच भक्कम होता, पण आता गोलंदाजीतही भारताकडे अनेक पर्याय आहेत. जलदगती गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा तर फिरकी गोलंदाजीत कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघ कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अफलातून कामगिरी करत आहे,’’ असेही श्रीधर यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 2:09 am

Web Title: resistance to practice matches is essential says shridhar
Next Stories
1 टेनिसपटूंनी आता कोणतीही कारणे देऊ नयेत –भूपती
2 राहुलचा भारत ‘अ’ संघात समावेश
3 नेयमार १० आठवडे बाहेर
Just Now!
X