केदार जाधवच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर शेष भारत संघाने इराणी चषक क्रिकेट सामन्यात बुधवारी कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात २० धावांची नाममात्र आघाडी मिळविली.
शेष भारताने १ बाद २० धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. जीवनज्योतसिंग (१७), पारस डोग्रा (२६), नमन ओझा (३४) व कर्णधार मनोज तिवारी (१४) हे अनुभवी फलंदाज तंबूत परतले त्या वेळी त्यांच्या १०२ धावा झाल्या होत्या. त्यांची ही घसरगुंडी रोखण्याची जबाबदारी केदारने जयंतच्या साथीत यशस्वीरीत्या पेलविली. त्यांनी आत्मविश्वासाने खेळ करत २४ षटकांमध्ये ८० धावांची भर घातली. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील ११ सामन्यांमध्ये १२२३ धावा करणाऱ्या केदारने दमदार खेळ करीत १३ चौकारांसह ७८ धावा केल्या. यादवने चार चौकारांसह २६ धावा केल्या. त्यामुळेच त्यांना पहिल्या डावात २६४ धावांपर्यंत मजल मारत २० धावांची आघाडी घेता आली. उर्वरित खेळात कर्नाटकने दुसऱ्या डावात बिनबाद ३९ धावा केल्या.
कर्नाटकच्या आर. विनयकुमार, अभिमन्यू मिथुन व श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. उर्वरित खेळांत त्यांच्या रवीकुमार समर्थ (नाबाद २१) व मयांक अगरवाल (नाबाद १५) यांनी ३९ धावांची अभेद्य सलामी दिली.

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक (पहिला डाव) : २४४ व (दुसरा डाव) बिनबाद ३९
शेष भारत (पहिला डाव) : ७५.४ षटकांत २६४ ( केदार जाधव ७८ ; अभिमन्यू मिथुन ३/४६, श्रेयस गोपाळ ३/५१).