नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा कुठे खेळवण्यात येणार, याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने रविवारी पहिल्यांदाच भाष्य केले. ‘‘देशात करोनाची तिसरी लाट अपेक्षित असताना उर्वरित ‘आयपीएल’ भारतात घेणे शक्य नाही,’’ असे स्पष्ट मत गांगुलीने व्यक्त केले.

‘‘भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामने खेळण्यासाठी जुले महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणे अपेक्षित आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कधी वेळ मिळेले, हे आताच सांगता येणार नाही,’’ असेही गांगुलीने सांगितले.

इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे ‘आयपीएल’ प्रशासकीय मंडळ आणि ‘बीसीसीआय’ सर्व शक्यतांचा विचार करून अंतिम निर्णय घेतील. जूनच्या मध्यापर्यंत हा निर्णय होणे अपेक्षित आहे. ‘‘आम्ही अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांशी चर्चा करून ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधी आयपीएलचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अनेक गोष्टी निगडित असल्याने आम्ही धीम्या गतीने त्यावर काम करत आहोत. ‘आयपीएल’ २०२१चे आयोजन करण्यात आम्ही असमर्थ ठरलो तर जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान आम्हाला सोसावे लागेल,’’ असेही गांगुली म्हणाला.

‘आयपीएल’ प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनीही अनेक मंडळांशी चर्चा केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात हा दुसरा टप्पा खेळवणे शक्य असल्याचे म्हटले आहे. ‘‘आम्ही आयपीएलच्या आयोजनासाठी संधीची वाट पाहत आहोत. सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन शक्य वाटत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि अन्य क्रिकेट मंडळांच्या योजनांचा आम्ही आढावा घेत आहोत,’’ असे पटेल म्हणाले.