महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. १५ ऑगस्टला संध्याकाळी दोघांनी एकापाठोपाठ निवृत्तीची घोषणा केली. पहिल्यांदा धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्ती स्विकारत असल्याचं जाहीर केलं. त्यापाठोपाठ सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवरुन धोनीला शुभेच्छा देत मी देखील तुझ्या मार्गावर चालायचं ठरवलं आहे असं म्हणत निवृत्ती स्विकारली. धोनी आणि रैनाने अशा पद्धतीने निवृत्ती जाहीर केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. १५ ऑगस्ट रोजीचं निवृत्ती का घेतली? असे म्हणत त्यांच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चेला माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानं पूर्णविराम दिला आहे. १५ ऑगस्ट रोजीच निवृत्ती का घेतली, याचं उत्तर सुरेश रैनानं दैनिक जागरणशी बोलताना दिलं आहे.

सुरेश रैना म्हणाला की, ‘आम्ही दोघांनी आधीपासूनच शनिवारी निवृत्ती घेण्याचं ठरवलं होतं. धोनीच्या जर्सी क्रमांक ७ आहे आणि माझ्या जर्सीचा क्रमांक ३ आहे. दोन्ही मिळून ७३ होतात. शनिवारी भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिवस होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी या दिवसाची निवड केली.’ निवृत्तीसाठी १५ ऑगस्टचीच निवड का केली, हे सांगत रैनाने सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.  रैना पुढे म्हणाला की, ‘२३ डिसेंबर २००४ रोजी धोनीनं बांगलादेश विरोधात भारतीय संघात पदार्पण केलं होतं. तर मी ३० जुलै २००५ रोजी श्रीलंका विरोधात दांबुला येथा पदार्पण केलं होतं. आम्ही दोघेही १५-१६ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो. दोघांनाही जवळपास एकाचवेळी पदार्पणही केलं होतं. तसेच चेन्नईच्या संघातही आम्ही दोघे सोबत होतो. आणि यापुढेही आयपीएलमध्ये एकत्रच खेलथ राहू.’

(आणखी वाचा : “धोनी देशाचं आभूषण, त्याला भारतरत्ननं सन्मानित करा” )

धोनी आणि रैनाचा दोस्ताना –
एम. एस. धोनी आणि सुरैश रैना यांना क्रिकेटमधील जय-विरु म्हटलं जाते. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सुरेश रैनानेही पाठोपाठ त्याच्या पावलावर पाऊल टाकत आपणही निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनी आणि सुरेश रैनाचा दोस्ताना हा सर्वांना ठावूक आहे. आपल्या कर्णधारपदाच्या काळात धोनीने सुरेश रैनाला अनेकदा संधी दिल्या. अनेकदा युवराज सिंहने रैना हा धोनीचा आवडता खेळाडू होता असं उघडपणे बोलूनही दाखवलं आहे. सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक साम्य आहेत. दोन्ही खेळाडूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय वन-डे कारकिर्दीची सुरुवात शून्यावर आऊट होऊन केली होती. दोन्ही खेळाडू भारताच्या विश्वचषक संघात सहभागी होते आणि आयपीएलमध्येही धोनी-रैना हे एकाच संघाकडून म्हणजेच चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतात.