नागमोडी वळणे, घाटदार रस्ते, अंगावर येणाऱ्या पर्वतराजीतून मार्गक्रमणा करत टूर डी फ्रान्स या ऐतिहासिक सायकल शर्यतीचे जेतेपद पटकावणे म्हणजे मानाचा तुरा. शर्यत सांघिक स्वरूपात होत असली तरी विजेता म्हणून संघातील अव्वल खेळाडूला बक्षीस मिळते. शंभर वर्षांच्या वाटचालीतील गाजलेल्या सायकलपटूंचा घेतलेला आढावा

लान्स आर्मस्ट्राँग
युसाडाने (अमेरिकन उत्तेजकविरोधी संघटना) आर्मस्ट्राँगच्या उत्तेजक सेवन प्रकरणाचा बुरखा फाडेपर्यंत तो ‘टूर डी फ्रान्स’चा अनभिषिक्त सम्राट होता. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करत टूर दी फ्रान्ससारख्या अवघड सायकल शर्यतीची तब्बल सात जेतेपदे नावावर करत आर्मस्ट्राँगने चमत्कार घडवला होता. आर्मस्ट्राँगच्या कहाणीने जगभरातील अनेक लोकांना प्रेरणा मिळाली, कर्करोगाविरुद्ध लढाईसाठी आर्मस्ट्राँगने पुढाकार घेतला. या विजेतेपदांनी आर्मस्ट्राँग अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरू लागला. मात्र या भ्रमाचा भोपळा गेल्या वर्षी फुटला. नैसíगक क्षमतेला मोठय़ा प्रमाणावर उत्तेजकांची जोड दिल्याचे आर्मस्ट्राँगने कबूल केले आणि टूर दी फ्रान्सची सगळी जेतेपदे त्याच्यापासून हिरावली. मात्र तरीही टूर डी फ्रान्स म्हटले की, आजही ‘यलो जर्सी’ परिधान केलेला आणि विजयी खूण दर्शवणारा आर्मस्ट्राँगच डोळ्यांसमोर येतो.

जॅक्स अँक्वेटिल
फ्रान्सच्या या भूमिपुत्राने टूर दी फ्रान्स शर्यत पाच वेळा जिंकण्याची किमया केली. शर्यतीच्या विविध टप्प्यांतही लीलया मार्गक्रमण करणाऱ्या जॅक्सने १९५७ आणि १९६१ ते १९६४ अशा टूर दी फ्रान्सच्या पाच जेतेपदांवर नाव कोरले आहे. या दिमाखदार कामगिरीसाठी त्याला फ्रान्स सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’ पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र उत्तेजकांबाबतच्या विचारांमुळे जॅक्स वादग्रस्त ठरला. ‘मला शांतपणे जगू द्या, प्रत्येक शर्यतपटू उत्तेजक सेवन करतो,’ या त्याच्या उद्गारांमुळे मोठय़ा वादाला तोंड फुटले होते.

बारोन मर्किक्स
सार्वकालीन महान सायकलपटू म्हणून बारोनचे वर्णन केले जाते. बेल्जियमच्या बारोननेही पाच वेळा टूर डी फ्रान्सच्या जेतेपदावर अधिराज्य गाजवले. हौशी तसेच व्यावसायिक गटात विश्वविजेता असलेला बारोन उत्तेजक सेवनाच्या विरोधात होता; मात्र शर्यतीदरम्यान तीन वेळा तो चाचणीअंती दोषी आढळला होता. निवृत्तीनंतरही बारोन सायकलिंग क्षेत्रातच कार्यरत आहे.

बर्नार्ड हिनॉल्ट
टूर डी फ्रान्स शर्यतीसह ग्रँड टूर्स शर्यतीतही जेतेपद पटकावणारा हिनॉल्ट हा हरहुन्नरी सायकलपटू. सहभागी झालेल्या प्रत्येक टूर डी फ्रान्स शर्यतीत बर्नार्डने अव्वल स्थान किंवा दुसरे स्थान राखले, यावरूनच त्याची मक्तेदारी लक्षात यावी. तब्बल पाच टूर डी फ्रान्स जेतेपदांच्या बरोबरीने ग्रँड टूर्सची तीन जेतेपदे त्याच्या नावावर आहेत. स्वतंत्र बाण्याचा आणि बेधडक व्यक्तिमत्त्वाचा बर्नार्ड आजही सायकलिंग क्षेत्रातले अग्रणी नाव आहे.

मिग्वेल लाराया
सायकलिंगला अनुकूल अशी विलक्षण नैसर्गिक क्षमता लाभलेला मिग्वेल हा फ्रान्सचा सायकलपटू. सामान्य माणसाच्या रक्तात ३-४ लीटर ऑक्सिजन असतो, मात्र लारायाच्या रक्तात सात लिटर ऑक्सिजन सामावतो. त्याची फुप्फुसे, हृदयही तुडुंब प्रमाणावर ऑक्सिजनचा साठा करणारे, त्यामुळे लारायाला थकवा-दम या गोष्टी जाणवत नाहीत. निसर्गाने दिलेल्या या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करत लारायाने १९९१ ते १९९५ या कालावधीत टूर दी फ्रान्सची पाच जेतेपदे नावावर केली.

हेन्री कॉर्नेट
वयाची विशी पूर्ण करण्याआधीच टूर डी फ्रान्स या आव्हानात्मक शर्यतीचे जेतेपद पटकावणारा फ्रान्सचा सायकलपटू.

फर्नमिन लॅमबोट
सायकलिंग ही मानवी शरीराच्या सक्षमतेची कसोटी पाहणारा खेळ आहे. वाढत्या वयाबरोबर हालचालींमध्ये शैथिल्य येते. सततची धावपळ, बदलणारे हवामान त्रासदायक ठरू शकते. मात्र या साचेबद्ध ठोकताळ्यांना भिरकावून देत ३६व्या वर्षी लॅमबोटने टूर डी फ्रान्सचे जेतेपद पटकावले.

ग्रेग लेमोंड
टूर डी फ्रान्स शर्यत जिंकणारा पहिला बिगरयुरोपियन शर्यतपटू. अमेरिकेत उद्योजक असणाऱ्या ग्रेगने तीन वेळा टूर डी फ्रान्स शर्यतीचे जेतेपद पटकावले. उत्तेजकविरोधी चळवळीचा खंदा पुरस्कर्ता असणाऱ्या ग्रेगने सायकलिंगला तांत्रिकदृष्टय़ा समृद्ध बनवण्यासाठी प्रयोग केले.

ख्रिस्तोफर फ्रूम
यंदाची अर्थात ऐतिहासिक शंभरावी शर्यत जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार. गतविजेता ब्रॅडले विगीन्सचा संघसहकारी.