रिकी पाँटींग हा ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. ९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा निर्माण करण्यात पाँटींगचा मोठा वाटा होता. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर पाँटींगने ऑस्ट्रेलियाना विश्वचषकही जिंकवून दिले आहेत. आपल्या काळात रिकी पाँटींग हा ‘पंटर’ या नावाने ओळखला जायचा. मात्र रिकी पाँटीगला पंटर हे नाव कोणी दिलं माहिती आहे का? खुद्द पाँटींगनेच याबद्दलचा खुलासा केला आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : सामन्यादरम्यान जखमी खेळाडूंसाठी गव्हर्निंग काऊन्सिलने घेतला मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने रिकी पाँटींगला पंटर हे नाव दिलं. “१९९० साली ज्यावेळी आम्ही क्रिकेट अकादमीत होतो, त्यावेळी आम्हाला ४० डॉलर प्रति महिने मिळत होते. त्यावेळी मला घोड्याच्या किंवा कुत्र्यांच्या शर्यतीवर पैसे लावण्याची सवय होती. ऑस्ट्रेलियात अशा लोकांना ‘पंट’ असं म्हटलं जातं, यावरुनच शेन वॉर्नने मला पंटर बोलायला सुरुवात केली.” सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला पाँटीगने उत्तर दिलं.

रिकी पाँटींगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोनवेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. सध्या पाँटींग आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला मार्गदर्शन करतोय. आयपीएलच्या मागच्या हंगामात रिकी पाँटींगच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीचा संघ प्रदीर्घ कालावधीनंतर प्ले-ऑफमध्ये पोहचला होता.

अवश्य वाचा – ऋषभ पंत लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेल !