इंग्लंडशी आज पहिला एकदिवसीय सामना

चेंडू फेरफार प्रकरणामुळे क्रिकेट प्रतिमेला डाग लागलेला ऑस्ट्रेलियाचा संघ नव्या खेळाडूंना घेउन पुन्हा एकदा मैदानावर राज्य करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या इंग्लंडशी त्यांचा बुधवारी पहिला सामना होणार आहे.

सोमवारी स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला सहा धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही डगमगला आहे. इंग्लंडची मुख्य मदार सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांच्यावर आहे. बेअरस्टोने सलग तीन सामन्यांत शतक झळकावत इंग्लंडतर्फे अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला.

दुसरीकडे मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूची फेरफार केल्यामुळे दोषी ठरवण्यात आलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्याशिवाय ऑस्ट्रेलिया प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. टीम पेनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियात डार्सी शॉर्ट, मायकल नेसर आणि अ‍ॅलेक्स करी यांसारखे अनेक नवे खेळाडू आहेत. या सामन्यात विजय मिळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाचे असेल.

  • सामन्याची वेळ : सायं. ५:३० वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स